आयपीएलमधून सुरुवात करणारा भारताचा डावखुरा फिरकीपटू अक्षर पटेलने आपल्या नावाच्या बाबतील एक किस्सा कपिल शर्माच्या कॉमेडी शोमध्ये शेअर केला आहे. अक्षरच्या नावाची स्पेलिंग कशी बदलली याची गोष्ट त्याने कपिलच्या शोमध्ये सांगितली आहे. सोनी टिव्हीवरील शनिवार आणि रविवारच्या एपिसोडमध्ये अक्षर सोबत आणखी काही खास पाहुणेदेखील होते. भारतीय क्रिकेटपटू नितीश राणा, राहुल तेवतिया, रवि बिश्नोई यांनी अक्षर पटेलसोबत कॉमेडी शो ‘द कपिल शर्मा शो’ मध्ये हजेरी लावली होती. नावाची स्पेलिंग चुकीची असून देखील आजपर्यंत त्याने त्यात बदल का केला नाही याचेही कारण त्याने यावेळी सांगितले.
कपिलने अक्षरला तुझे नाव ‘अक्सर’ म्हणजेच नेहमीच असे ऐकायला मिळत नाही. खूप वेगळे नाव, तुझे नाव अक्सर आहे की अक्षर आहे असा प्रश्न केला. त्यावेळी अक्षरने ते अक्सर नसून अक्षर आहे आणि ते लिहिताना अक्सर असे लिहिले जाते असे सांगितले. यावेळी अक्षरने यामागील इतिहास सांगितला.
“मी जेव्हा १९ वर्षाखालील विश्वचषक संघाच्या कॅम्पमध्ये बंगळुरू येथे होतो तेव्हा माझ्याकडे पासपोर्ट नव्हता. त्यावेळी माझे वय १७ होते. त्यावेळी माझे १९ वर्षाखालील विश्वचषकाच्या संघामध्ये निवड झाली. त्यावेळी संघाला ऑस्ट्रेलियाला जायचे होते त्यामुळे व्यवस्थापनाकडून व्हिसासाठी पासपोर्ट मागण्यात आला. पासपोर्ट बनवण्यासाठी वडिलांना मी तात्काळ लिव्हिंग सर्टिफिकेट आणण्यास सांगितले. पण मुख्याध्यापकांनी घाईमध्ये त्या सर्टिफिकेटवर अक्षरची स्पेलिंग ही ‘Axar’ अशी लिहिली. त्यानंतर तेच नाव पासपोर्ट आणि इतर कागदपत्रांवर आले”, असे अक्षरने सांगितले.
दरम्यान, तू नावाची स्पेलिंग नंतर बदलली का नाही असा प्रश्न कपिलने केला. “नावाची स्पेलिंग बदलल्यानंतर वर्षभरातच माझी भारतीय संघात निवड झाली. मग मी विचार केला या नावामुळे छान सुरू आहे त्यामुळे जे आहे तेच राहु देवूयात” असे उत्तर अक्षरने दिले. अक्षरच्या उत्तराने कार्यक्रमामध्ये उपस्थित असलेल्या सर्वांनाच हसू फुटले.