निवृत्त पोलीस महासंचालक आणि ज्येष्ठ क्रीडा मानसोपचार तज्ज्ञ भीष्मराज पुरूषोत्तम बाम (७९) यांचे शुक्रवारी सायंकाळी सव्वासहाच्या सुमारास येथे हृदयविकाराने निधन झाले. विशेष म्हणजे निवृत्तीनंतरच्या आयुष्यात ज्या विषयावर ते सदैव खेळाडूंना मार्गदर्शन करीत राहिले त्याच योगा या विषयावर ते एका सभागृहात मार्गदर्शन करीत असतानाच त्यांना हृदयविकाराचा झटका आला.
महात्मानगर सभागृहात दर शुक्रवारी बाम हे योगा विषयावर नागरिकांसह खेळाडूंना मार्गदर्शन करीत असत. सभागृहात मार्गदर्शन करीत असताना त्यांना हृदयविकाराचा त्रास जाणवू लागल्यानंतर उपस्थितांनी तातडीने लगतच्या खासगी रुग्णालयात नेले. परंतु, तत्पुर्वीच त्यांचे निधन झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. या घटनेचे वृत्त समजताच क्रीडापटू, प्रशिक्षकांनी रुग्णालय व निवासस्थानी धाव घेतली.
भीष्मराज बाम यांच्या सल्ल्यामुळे कारकीर्दीला पूर्णपणे वेगळे वळण लागलेले अनेक क्रीडापटू आहेत. त्यामध्ये नेमबाज अंजली भागवत, अभिनव बिंद्रा, टेनिसपटू लिएँडर पेस, महेश भूपती, क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर, राहुल द्रवीड, धावपटू कविता राऊत आदी दिग्गजांचा समावेश आहे. क्रीडा मानसोपचाराकडे वळण्यामागे बाम यांना कारणीभूत झाली पोलीस महासंचालकपदाहून निवृत्त झाल्यानंतरची एक दुखापत. या दुखापतीमुळे बाम यांना सहा महिन्यांपेक्षा अधिक दिवस आराम करावा लागला. यादरम्यान काही रशियन पुस्तके त्यांच्या वाचण्यात आली. त्यात एका पुस्तकातील ‘आपलं मन हाच आपला शत्रू’ हे वाक्य त्यांना अधिक भावले. स्वत: एक उत्कृष्ठ नेमबाज असलेल्या बाम यांनी त्यानंतर मग योग आणि मन यांचा क्रीडा क्षेत्राच्या दृष्टिकोनातून अभ्यास करण्यास सुरूवात केली. क्रीडा मानसोपचाराचा रितसर अभ्यासक्रमही पूर्ण केला. काही खेळाडूंच्या कामगिरीत त्यांनी दिलेल्या सल्ल्यानुसार फरक पडत गेल्यावर दिग्गज खेळाडू त्यांच्याकडे मार्गदर्शन घेण्यास येऊ लागले. २००१ पर्यंत माजी क्रिकेट कसोटीपटू राहुल द्रवीड हा अत्यंत संथपणे खेळत असे. फटकेबाजी करण्याचा प्रयत्न करूनही ते जमत नव्हते. अशा वेळी बाम यांनी दिलेल्या सल्ल्यामुळे द्रवीडच्या कामगिरीत आमूलाग्र बदल झाला. क्रिकेटप्रेमींना त्यानंतर फटकेबाज द्रवीडचे दर्शन झाले. तीच गोष्ट नेमबाज अंजली भागवतची. बाम यांच्या मार्गदर्शनाची २००० च्या राष्ट्रकुल स्पर्धेत अंजली भागवतला सुवर्णपदकांना गवसणी घालण्यास मदत झाली. नाशिकची आंतरराष्ट्रीय धावपटू कविता राऊत तर बाम यांच्यासाठी मुलीप्रमाणेच. निराशेचे क्षण आले की कविताला बाम यांच्या मार्गदर्शनाचा आधार मिळत असे.
अगदी अलीकडे रिओ ऑलिम्पिकपूर्वी बंगळूरू येथे आयोजित शिबीरात खेळाडूंना मानसिकदृष्टय़ा कणखर कसे राहावे यासंदर्भात मार्गदर्शन करण्यासाठी बाम यांना भारतीय क्रीडा प्राधिकरणनातर्फे आमंत्रित करण्यात आले होते. त्यांच्याबरोबर पुण्याच्या ज्योती कानिटकर यांनाही बोलविण्यात आले होते. साधारणत: महिनाभरासाठी बाम यांच्या व्याख्यानांचे आयोजन करण्यात आले होते. परंतु, त्या ठिकाणी क्रीडा क्षेत्रातील विचित्र राजकारण सहन न झाल्याने बाम हे अवघ्या दोन आठवडय़ात परत आले.
१९९८ मध्ये नाशिकमध्ये नेमबाजीची क्रीडा प्रबोधिनी स्थापन करून त्याव्दारे अनेक राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय नेमबाज घडविले.
नेमबाजीला प्रोत्साहन देण्यासाठी बाम यांनी एक्स एल टारगेट शुटर्स असोसिएशनची स्थापना केली. पुरूषोत्तम अकॅडमीचे संस्थापक, पुण्याच्या चाणक्य मंडळाचे विश्वस्त व मार्गदर्शक, योग विद्या धामच्या योग गुरुकुल विभागात अध्यापक म्हणून त्यांनी काम पाहिले.
ते आम्हा सर्व खेळाडूंचे ‘गॉडफादर’ होते. राष्ट्रकुल स्पर्धेस जाण्याआधी त्यांनी माझ्याकडे ‘कविता तु मला आताच स्वाक्षरी देऊन ठेव कारण स्पर्धा झाल्यानंतर तुझ्याकडे तितकाही वेळ राहणार नाही याची मला खात्री आहे’ असे सांगितले होते. खेळाडूंविषयी त्यांना असलेला विश्वास त्यांची आपुलकी, माणुसकी सर्वकाही दर्शवितो. – कविता राऊत (आंतरराष्ट्रीय धावपटू)
देशातील नामवंत क्रीडापटूंचे गुरू असणारे भीष्मराज बाम सर पोलीस अधिकारी-कर्मचारी व खेळाडूंचे मार्गदर्शक होते. पोलीस दलातील खेळाडूंना ते नेहमी मार्गदर्शन करायचे. क्रीडा मानसोपचाराचे मार्गदर्शन करीत त्यांनी अनेक प्रतिथयश खेळाडू घडविले. – रवींद्र सिंगल (पोलीस आयुक्त, नाशिक)
काही माणसे आपल्यावर वडिलांसमान प्रेम करतात. डॉ. बाम हे त्यांच्यापैकीच एक होते. भारतीय नेमबाजांना जागतिक स्तरावर जी कीर्ती लाभली आहे ती केवळ बाम यांच्यामुळेच. आम्ही ज्या वेळी या खेळात उतरलो त्या वेळी आमचे ज्ञान खूपच अल्प होते. अक्षरश: शून्यातून आम्हाला जागतिक स्तरावरील ज्ञान व अनुभव त्यांच्यामुळेच मिळाला. महाराष्ट्राच्या नेमबाजांनी जागतिक स्तरावरील विविध स्पर्धामध्ये जी काही पदकांची लयलूट केली आहे, त्यामध्ये बाम सरांनी शिकविलेल्या अनेक मौलिक सूचनांचा मोठा वाटा आहे. आम्हाला ऑलिम्पिकमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करता आले, त्याचे श्रेय बाम सरांनाच देता येईल. अफाट बुद्धिमत्ता, परंतु अतिशय निगर्वी व्यक्तिमत्त्व लाभलेले क्रीडातज्ज्ञ म्हणूनच त्यांची ओळख होती. प्रत्येक भेटीच्या वेळी त्यांच्याकडून काहीतरी नवीन शिकायला मिळत असे. समोरच्या व्यक्तीचे बारकाईने निरीक्षण करून त्यानुसार त्याला शिकविण्याची हातोटी त्यांच्याकडे होती. खेळाडूंच्या हक्कासाठी ते नेहमी भांडत असत, मात्र कधीही त्यांनी आपला संयम सोडला नाही. – अंजली भागवत, आंतरराष्ट्रीय नेमबाज