श्रीलंकेविरुद्धच्या तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत शिखर धवनच्या नेतृत्वातील भारतीय क्रिकेट संघाने २-० अशी विजयी आघाडी घेतली आहे. कोलंबोच्या आर. प्रेमदासा स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या पहिल्या सामन्यात टीम इंडियाने ७ गडी राखून विजय मिळविला, तर मंगळवारी झालेल्या दुसर्‍या वनडे सामन्यात ३ गडी राखून विजय मिळवला. प्रथम सूर्यकुमार यादव आणि त्यानंतर दीपक चहरच्या अर्धशतकांच्या मदतीने संघाला हा विजय मिळाला. दुसर्‍या वनडे सामन्यात श्रीलंका संघाचा विजय जवळपास निश्चित मानला जात होता. परंतु महत्त्वपूर्ण प्रसंगी झालेल्या चुकांमुळे यजमानांना पराभवाला सामोरे जावे लागले. या दरम्यान, श्रीलंका संघाचे प्रशिक्षक मिकी आर्थर ड्रेसिंग रूममध्ये बसून अस्वस्थ दिसत होते. सामना संपल्यानंतर श्रीलंकेचा कर्णधार दासुन शनाकासोबत आर्थर यांचे भांडण पाहायला मिळाले. त्यांच्या भांडणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

भारत आणि श्रीलंका यांच्यातील दुसर्‍या वनडे सामन्यानंतर श्रीलंकेचा माजी दिग्गज खेळाडू रसेल अर्नोल्डनेही मिकी आर्थर यांच्या या वर्तनावर भाष्य केले आहे. त्याने ट्वीट केले, “प्रशिक्षक आणि कर्णधार यांच्यात संभाषण मैदानावर नसावे, ड्रेसिंग रूममध्ये असावे.” या व्हिडिओमध्ये दासुन शनाका आणि मिकी आर्थर एका गोष्टीवर जोरदार वाद घालताना दिसले आहेत. आर्थर कर्णधाराला कशाबद्दल तरी बोलताना दिसले, तर दासुन शनाका त्यांना त्याच्या बाजूने पटवून देण्याचा प्रयत्न करताना दिसला.

 

हेही वाचा – सुरेश रैनानं स्वत: ला म्हटलं ‘ब्राह्मण’; भडकलेले नेटकरी म्हणाले, “तुला लाज…”

सामन्यात श्रीलंकेचा कर्णधार दासुन शनाकाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. लंकेने ९ गडी गमावून २७५ धावा केल्या. भारतीय संघाने ५ चेंडू शिल्लक ठेऊन हा सामना जिंकला. १९३ धावांवर भारताने ७ गडी गमावले होते. पण दीपक चहर आणि भुवनेश्वर कुमार यांनी ८४ धावांची अभेद्य भागीदारी रचली. यात भुवनेश्वर कुमारने नाबाद १९ धावा केल्या. तर चहरने ८२ चेंडूत ६९ धावा केल्या. यात ७ चौकार आणि एका षटकाराचा समावेश होता. चहरचा हा पाचवा एकदिवसीय सामना होता. तत्पूर्वी, गोलंदाजीतही चहरने ५३ धावा देऊन २ बळी घेतले.