तिसऱ्या सामन्यात बांगलादेशचा १२२ धावांनी धुव्वा; मॅथ्यूज मालिकावीर
कोलंबो : अनुभवी फलंदाज अँजेलो मॅथ्यूज आणि कुशल मेंडिस यांनी साकारलेल्या दमदार अर्धशतकांना वेगवान गोलंदाजांची अप्रतिम साथ लाभल्यामुळे श्रीलंकेने तिसऱ्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात बांगलादेशचा १२२ धावांनी धुव्वा उडवला. या विजयासह श्रीलंकेने मालिकेत ३-० असे निर्भेळ यश संपादन केले. त्याशिवाय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती पत्करलेल्या नुवान कुलसेकराला त्यांनी हा विजय समर्पित केला.
श्रीलंकेने दिलेल्या २९५ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना बांगलादेशचा डाव ३६ षटकांत १७२ धावांत संपुष्टात आला. ८७ धावांची झुंजार खेळी साकारणाऱ्या मॅथ्यूजला सामनावीर, तसेच मालिकेत दोन अर्धशतकांसह एकूण १८७ धावा केल्यामुळे मालिकावीर पुरस्कारानेसुद्धा गौरवण्यात आले.
प्रथम फलंदाजी करताना मॅथ्यूज आणि मेंडिस (५४) यांनी चौथ्या गडय़ासाठी १०१ धावांची भागीदारी रचल्यामुळे श्रीलंकेने ५० षटकांत ८ बाद २९४ धावांपर्यंत मजल मारली. दिमुथ करुणारत्ने (४६) आणि कुशल परेरा (४२) यांनीसुद्धा बहुमूल्य योगदान दिले.
प्रत्युत्तरादाखल दसुन शनका, कसुन रजिथा आणि लहिरु कुमारा या वेगवान त्रिमूर्तीने सात फलंदाजांना माघारी पाठवल्यामुळे बांगलादेशचा डाव १७२ धावांत संपुष्टात आला. सौम्य सरकार (६९) आणि तैजुल इस्लाम (नाबाद ३९) यांना वगळता एकाही बांगलादेशच्या फलंदाजाला २० धावांचा टप्पा ओलांडता आला नाही.
संक्षिप्त धावफलक
श्रीलंका : ५० षटकांत ८ बाद २९४ (अँजेलो मॅथ्यूज ८७, कुशल मेंडिस ५४; सौम्य सरकार ३/५६) विजयी वि. बांगलादेश : ३६ षटकांत सर्वबाद १७२ (सौम्य सरकार ६९, तैजुल इस्लाम नाबाद ३९; दसुन शनका ३/२७, कसुन रजिथा २/१७).
’ सामनावीर आणि मालिकावीर : अँजेलो मॅथ्यूज