ऑस्ट्रेलियाविरुद्धचा दुसरा ट्वेन्टी-२० सामना २ धावांनी जिंकत श्रीलंकेने दोन सामन्यांच्या मालिकेत निर्विवाद विजय मिळवला. महेला जयवर्धनेच्या नाबाद ६१ धावांच्या खेळीच्या जोरावर श्रीलंकेने १६१ धावांची मजल मारली. जयवर्धनेने ४५ चेंडूत ५ चौकार आणि २ षटकारांसह ६१ धावांची खेळी केली. थिसारा परेराने १५ चेंडूत ३ चौकार आणि २ षटकारांसह ३५ धावा करत जयवर्धनेला चांगली साथ दिली. ऑस्ट्रेलियातर्फे ग्लेन मॅक्सवेल, जेम्स फॉल्कनर, बेन लॉलिन आणि झेव्हियर डोहर्टी यांनी प्रत्येकी १ बळी टिपला. ऑस्ट्रेलियाने ९ षटकांत २ बाद ५४ अशी सुरुवात केली. यानंतर पावसाचे आगमन झाल्याने पाच षटकांचा खेळ वाया गेला आणि ऑस्ट्रेलियाला विजयासाठी १२२ धावांचे सुधारित लक्ष्य मिळाले. शॉन मार्शने नाबाद ४७ तर जॉर्ज बेलीने ४५ धावांची खेळी केली मात्र ऑस्ट्रेलियाला दोन धावांनी पराभवाला सामोरे जावे लागले. ३५ धावा आणि १ बळी टिपणाऱ्या थिसारा परेरला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले. कसोटी मालिकेत मानहानीकारक पराभवाला सामोरे जावे लागलेल्या श्रीलंकेच्या संघाने एकदिवसीय मालिका बरोबरीत सोडवली तर ट्वेन्टी-२० मालिका जिंकत शानदार पुनरागमन केले.