24 फेब्रुवारीपासून सुरु होणाऱ्या भारत दौऱ्याआधी ऑस्ट्रेलियन संघाला मोठा धक्का बसला आहे. स्नायूंना झालेल्या दुखापतीमुळे कांगारुंचा महत्वाचा जलदगती गोलंदाज मिचेल स्टार्क संघाबाहेर गेला आहे. श्रीलंकेविरुद्ध दुसऱ्या कसोटी सामन्यात 10 बळी घेत स्टार्क ऑस्ट्रेलियन संघाच्या विजयात महत्वाची भूमिका बजावली होती. मात्र याच सामन्यादरम्यान त्याच्या स्नायूंवर ताण आल्याचं बोललं जातंय, यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून क्रिकेट ऑस्ट्रेलियाने त्याला भारताविरुद्ध मालिकेच्या संघात जागा दिली नाहीये.

भारत दौऱ्यात ऑस्ट्रेलियाचा संघ 2 टी-20 आणि 5 वन-डे सामन्यांची मालिका खेळणार आहे. घरच्या मैदानावर खेळत असताना ऑस्ट्रेलियाला भारताकडून कसोटी आणि वन-डे अशा दोन्ही मालिकेत पराभवाचा सामना करावा लागला होता. या पराभवाचा वचपा काढण्याची चांगली संधी यंदा ऑस्ट्रेलियन संघाकडे उपलब्ध असणार आहे.

भारत दौऱ्यासाठी असा असेल ऑस्ट्रेलियन संघ

अरॉन फिंच (कर्णधार), पॅट कमिन्स (उप-कर्णधार), अॅलेक्स केरी (उप-कर्णधार), जेसन बेहरनडॉर्फ, नॅथन कुल्टर-नाईल, पिटर हँडस्काँब, उस्मान ख्वाजा, नॅथन लॉयन, शॉन मार्श, ग्लेन मॅक्सवेल, झाय रिचर्डसन, केन रिचर्डसन, डार्सी शॉर्ट, मार्कस स्टॉयनिस, अॅश्टन टर्नर, अॅडम झाम्पा