परभणी : यजमान परभणीसह रत्नागिरी, कोल्हापूर, औरंगाबाद यांनी ६८व्या वरिष्ठ महिला गट राज्य अजिंक्यपद  निवड चाचणी स्पर्धेची उपांत्यपूर्व फेरी गाठली, तर पुणे, मुंबई शहर, मुंबई उपनगर, पालघर यांनी थेट उपांत्यपूर्व फेरी गाठली.

पाथरी येथील कबड्डीमहर्षी बुवा साळवी क्रीडानगरीत झालेल्या उपउपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात यजमान परभणीने बलाढ्य ठाण्याला ४१-३३ असे रोखले. सुरुवातीपासून आक्रमक पवित्रा घेत खेळणाऱ्या परभणीने मध्यांतराला २३-१५ अशी भक्कम आघाडी घेतली होती. नंतर सावध पवित्रा घेत विजयावर शिक्कामोर्तब केले. निकिता व कोमल लंगोट भगिनी आणि गौरी दहे यांचा झंझावाती खेळामुळे परभणीने हा विजय ८ गुणांनी साकारला.

ठाण्याकडून चंद्रिका जोशी, माधुरी गवंडी यांनी उत्तम खेळ करीत सामन्यात चुरस निर्माण केली, पण ठाण्याला विजय मिळवून देण्यात त्या अपयशी ठरल्या. दुसऱ्या सामन्यात रत्नागिरीने रायगडचा प्रतिकार ३६-२५ असा मोडून काढला. विश्रांतीला रत्नागिरीकडे १९-१४ अशी महत्त्वपूर्ण आघाडी घेतली होती. समरीन व तसरीम या बुरोंडकर भगिनी या विजयात चमकल्या. रचना म्हात्रे, तेजा सपकाळ यांचा चतुरस्रा खेळ रायगडचा पराभव टाळू शकला नाही.

स्नेहा शिंदे, पूजा जोशीलकर यांच्या नेत्रदीपक खेळामुळे कोल्हापूरने सोलापूरचा ६५-३७ असा सहज पराभव केला. शेवटच्या चुरशीच्या लढतीत औरंगाबादने धुळ्याचा प्रतिकार २७-२४ असा संपुष्टात आला. तृप्ती अंधारे, स्वाती ढगे यांच्या संयमी खेळाला या विजयाचे सारे श्रेय जाते. धुळ्याकडून ज्योती डफळे, आरती पाटील यांनी उत्कृष्ट खेळ करीत सामन्यातील रंगत कायम ठेवली.