*राज्य कबड्डी असोसिएशनचा तारखांचा गोंधळ

*स्पर्धासंयोजकांचे धाबे दणाणले

महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनचे कार्याध्यक्ष आणि महाकबड्डीचे समन्वयक दत्ता पाथ्रीकर यांची मंजुरी घेऊन गॉडविट कंपनीने दुसऱ्या महाकबड्डी लीगच्या हंगामाचे शिवधनुष्य उचलले आहे. परंतु १२ ते २९ जानेवारी या कालावधीत होणाऱ्या या लीगमुळे आणि त्याआधी होणाऱ्या सराव शिबिरांमुळे राज्यस्तरीय स्पर्धा घेणाऱ्या संयोजकांचे मात्र धाबे दणाणले आहेत.

पाथ्रीकर, गॉडविट कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक सिद्धार्थ मेहता आणि संघमालकांच्या २१ नोव्हेंबरला झालेल्या बैठकीत महाकबड्डी लीगच्या दुसऱ्या हंगामाच्या तारखा निश्चित करण्यात आल्या होत्या. मात्र एकीकडे महाकबड्डीचे ‘महास्वप्न’ पाहणाऱ्या महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनने याच कालावधीत अनेक महत्त्वाच्या राज्यस्तरीय स्पर्धाना आधीच मान्यता दिलेली आहे. परंतु महत्त्वाचे खेळाडू खेळू शकले नाहीत, तर प्रमुख संघसुद्धा माघार घेण्याची शक्यता आहे. त्यामुळे स्पध्रेत रंगतदार सामने होणार नाहीत, अशी भीती हे स्पर्धा संयोजक व्यक्त करीत आहेत.

महाकबड्डीचा दुसरा हंगाम डिसेंबरमध्ये घेण्याचे आधी राज्य कबड्डी असोसिएशनचे नियोजन होते. त्यामुळे या महिन्यात योजनापूर्वक स्पर्धाना मान्यता दिल्या नव्हत्या. परंतु आता प्रशासकीय पातळीवर महाकबड्डीचा वाद सुरू असताना जानेवारीच्या तारखांमुळे अनेक स्पर्धासंयोजक नाराज झाले आहेत. महाकबड्डीच्या कालखंडात होणाऱ्या चार राज्यस्तरीय स्पर्धाचे अतोनात नुकसान होणार आहे.

याबाबत महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनचे संयुक्त सचिव मंगल पांडे यांनी सांगितले की, ‘‘महाकबड्डी लीगच्या तारखा आम्हाला वर्तमानपत्रांतून कळल्या. महाकबड्डीच्या अचानक घोषणेमुळे या कालावधीत राज्यस्तरीय स्पर्धा आयोजित करणाऱ्या संयोजकांची कोंडी झाली आहे. या स्पर्धाच्या आयोजनासाठी संयोजक संस्थांनी आर्थिक गुंतवणूक करून तयारीही सुरू केली होती. परभणी जिल्हा कबड्डी असोसिशनकडून याबाबत राज्य संघटनेला पत्र पाठवण्यात आले आहे.’’

याबाबत संघटनेचे कार्याध्यक्ष दत्ता पाथ्रीकर म्हणाले, ‘‘महाकबड्डी लीग आधी डिसेंबरमध्ये होणार होती. मात्र संघमालकांच्या विनंतीमुळे ती जानेवारीमध्ये घेण्यात आली. या तारखांसदर्भात मी राज्य कबड्डी असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांना पूर्ण कल्पना दिली होती. फक्त गैरसमज आणि द्वेषाच्या भावनेतून सध्या अपप्रचार केला जात आहे.’’

 

महाकबड्डीच्या कालखंडातील राज्यस्तरीय स्पर्धा

 ८ ते १२ जानेवारी

राष्ट्रवादी युवक काँग्रेस, ठाणे

स्थानिक पुरुष आणि महिला

१६ ते २० जानेवारी      

पार्ले स्पोर्ट्स क्लब, विलेपार्ले

व्यावसायिक पुरुष आणि स्थानिक महिला

२२ ते ३० जानेवारी  

क्रांती क्रीडा मंडळ, घाटकोपर

स्थानिक पुरुष आणि महिला

२७ ते ३० जानेवारी

यशवंतराव चव्हाण व्यायाम प्रसारक मंडळ, परभणी

व्यावसायिक पुरुष

 

शिबिरांच्या कालखंडातील स्पर्धा

४ ते ७ जानेवारी   

पांचगणी व्यायाम मंडळ, पांचगणी

व्यावसायिक पुरुष आणि स्थानिक महिला

५ ते ८ जानेवारी  

आरंभ सोशल फाऊंडेशन, चिंचवड

व्यावसायिक पुरुष आणि स्थानिक महिला

 ६ ते १० जानेवारी  

कोल्हापूर कबड्डी असोसिएशन, कोल्हापूर</p>

स्थानिक पुरुष आणि महिला