विम्बल्डन खुली टेनिस स्पर्धा : त्सित्सिपास सलामीलाच गारद

सर्बियाचा नोव्हाक जोकोव्हिच आणि बेलारूसची आर्यना सबालेंका यांनी मात्र संघर्षपूर्ण विजयासह दुसरी फेरी गाठली.

स्टेफानोस त्सित्सिपास

जोकोव्हिच, सबालेंका यांचे संघर्षपूर्ण विजयजोकोव्हिच, सबालेंका यांचे संघर्षपूर्ण विजय

नवी दिल्ली : विम्बल्डन खुल्या टेनिस स्पर्धेच्या पहिल्याच दिवशी धक्कादायक निकालाची नोंद झाली. दोन आठवडय़ांपूर्वीच फ्रेंच ग्रँडस्लॅम स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारणाऱ्या ग्रीसच्या स्टेफानोस त्सित्सिपासला सोमवारी पहिल्याच फेरीत गाशा गुंडाळावा लागला. सर्बियाचा नोव्हाक जोकोव्हिच आणि बेलारूसची आर्यना सबालेंका यांनी मात्र संघर्षपूर्ण विजयासह दुसरी फेरी गाठली.

पुरुष एकेरीत अमेरिकेच्या बिगरमानांकित फ्रान्सेस टिआफोएने तिसऱ्या मानांकित त्सित्सिपासला ६-४, ६-४, ६-३ अशी सरळ तीन सेटमध्ये धूळ चारली. त्सित्सिपासने लाल मातीवरील फ्रेंच स्पर्धेच्या अंतिम फेरीत जोकोव्हिचला कडवी झुंज दिली होती. परंतु हिरवळीवर त्याला कमाल करता आली नाही. २०१९मध्ये त्सित्सिपासला पहिल्याच लढतीत पराभव पत्करावा लागला होता. करोना साथीच्या पार्श्वभूमीवर गतवर्षी विम्बल्डन स्पर्धा रद्द करण्यात आलेली.

जागतिक क्रमवारीत अग्रस्थानी विराजमान असलेल्या जोकोव्हिचने ब्रिटनच्या बिगरमानांकित जॅक ड्रॅपरला ४-६, ६-१, ६-२, ६-२ असे चार सेटमध्ये पिछाडीवरून नमवले. हा सामना दोन तास, चार मिनिटे रंगला. जोकोव्हिचने सलग तिसऱ्या ग्रँडस्लॅम सामन्यात पहिला सेट गमावूनही विजय मिळवला. फ्रेंच स्पर्धेच्या उपांत्य आणि अंतिम फेरीतही त्याने अशी कामगिरी केली होती.

महिलांमध्ये दुसऱ्या मानांकित सबालेंकाने मोनिका निकोलेस्क्यूवर ६-१, ६-४ अशी मात करून दुसरी फेरी गाठली. स्पेनच्या ११व्या मानांकित गार्बिन मुगुरुझाने फिओना फेरोवर ६-०, ६-१ असे वर्चस्व गाजवले. ऑस्ट्रेलियाच्या चौथ्या मानांकित सोफिआ केनिनने वँग झिनयूवर ६-४, ६-२ अशी सरशी साधली.

सानिया, अंकिता दुहेरीत खेळणार

भारताची अनुभवी टेनिसपटू सानिया मिर्झा आणि अंकिता रैना विम्बल्डनच्या महिला दुहेरीत विदेशी खेळाडूसह खेळणार आहेत. अंकिता अमेरिकेच्या लॉरेन डेव्हिससह, तर सानिया अमेरिकेच्या बेथानी सँड्सच्या साथीने खेळणार आहे. त्याशिवाय पुरुष दुहेरीत रोहन बोपण्णा आणि दिविज शरण यावेळी एकत्रित खेळणार आहेत.

कोन्ताची माघार

तीन वेळा ग्रँडस्लॅम स्पर्धेची उपांत्य फेरी गाठणाऱ्या ब्रिटनच्या जोहना कोन्ताला करोनाची लागण झाल्यामुळे ऐनवेळी विम्बल्डनमधून माघार घ्यावी लागली. त्यामुळे तिची प्रतिस्पर्धी कॅटरिना सिनिआकोव्हाला पुढील फेरीत चाल देण्यात आली.

 

 

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Stefanos tsitsipas knocked out by frances tiafoe in wimbledon 2021 first round zws

Next Story
ऑलिम्पिक पदकात पुण्याचाही वाटा -सायना
ताज्या बातम्या