ऋषिकेश बामणे

एखाद्या कुटुंबातील आई-वडील आणि अन्य सदस्यही विशिष्ट खेळात निष्णात असतील, तर येणारी पिढीही आपोआपच त्या खेळाकडे आकर्षित होते. परंतु एखादा लहान मुलगा वयाच्या तिसऱ्या वर्षांपासूनच टेनिस, फुटबॉल, जलतरण असे शारीरिक तंदुरुस्तीचा कस पाहणारे खेळ खेळत असेल, तर त्यातील नेमके कौशल्य हेरणे आव्हानात्मक असते. परंतु वडिलांनी आपल्या मुलातील कौशल्य अचूक ओळखले आणि तेथूनच सुरू झाला उगवता टेनिस सम्राट स्टीफानोस त्सित्सिपासचा प्रवास.

१९९८मध्ये ग्रीस येथे जन्मलेल्या आणि आता वयाच्या २१व्या वर्षी जागतिक क्रमवारीत सहाव्या स्थानी असलेल्या तित्सिपासच्या नावावर ना एखादे ग्रँडस्लॅम विजेतेपद आहे, ना अन्य स्पर्धामधील विजेतेपदांची मोठी यादी. परंतु अल्पावधीतच त्याने घेतलेल्या भरारीची दखल संपूर्ण टेनिसविश्वाने घेतली आहे. विशेषत: तब्बल २० ग्रँडस्लॅम विजेतेपदे नावावर असलेल्या स्वित्र्झलडच्या रॉजर फेडररला वर्षांतून दोन वेळा नमवणे भल्याभल्यांना आजपर्यंत जमलेले नाही. परंतु त्सित्सिपासने हा पराक्रम करून दाखवला आहे. त्यामुळेच फेडरर, राफेल नदाल आणि नोव्हाक जोकोव्हिच या टेनिसच्या त्रिमूर्तीला आव्हान देणारा नवा तारा उदयास आला आहे, अशी ग्वाही त्याची कामगिरी देत आहे.

जर्मनीचे महान टेनिसपटू बोरिस बेकर यांनी गेल्या आठवडय़ातच त्सित्सिपासचे कौतुक करताना मत व्यक्त केले की, ‘‘नदाल, फेडरर आणि जोकोव्हिच यांच्यानंतर गेली अनेक वर्षे टेनिसप्रेमी नव्या ताऱ्याचा शोध घेत होती. परंतु एटीपी अंतिम टप्प्यानंतर तो शोध संपला आहे, असे मला वाटते.’’ त्सित्सिपासने या स्पर्धेत डॅनिएल मेदवेदेव, अ‍ॅलेक्झांडर झ्वेरेव्ह यांना साखळी लढतीत पराभूत केले, तर नदालविरुद्ध त्याला पराभव पत्करावा लागला. मात्र उपांत्य फेरीत फेडरर आणि अंतिम सामन्यात डॉमिनिक थीएमला नमवून विजेतेपद मिळवले. मुख्य म्हणजे हे सर्व खेळाडू मानांकनामध्येही त्सित्सिपासपेक्षा वरच्या क्रमांकावर होते.

वयाच्या सहाव्या वर्षी अ‍ॅथेन्समधील एका अकादमीत वडिलांच्याच मार्गदर्शनाखाली त्सित्सिपास टेनिस बाराखडी शिकला. पुढे शालेय स्तरावर चमक दाखवल्यानंतर २०१३मध्ये त्सित्सिपास प्रथमच ‘आयटीएफ’ कनिष्ठ सर्किट स्पर्धेत सहभागी झाला. पहिल्या वर्षी त्याचे साखळीतच आव्हान संपुष्टात आले. २०१५मध्ये पहिल्यांदाच कनिष्ठ गटाच्या ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेमध्ये सहभागी होणाऱ्या त्सित्सिपाससाठी २०१६ हे वर्ष प्रेरणादायी ठरले. त्याने चारही कनिष्ठ ग्रँडस्लॅम स्पर्धाच्या उपांत्यपूर्व फेरीत धडक मारून क्रमवारीत अग्रस्थान मिळवले. त्याच वर्षी युरोपियन अजिंक्यपद मिळवून विम्बल्डनच्या पुरुष दुहेरीतही त्याने विजेतेपद मिळवले.

२०१७मध्ये वयाच्या १९व्या वर्षी त्सित्सिपासने प्रथमच फ्रेंच टेनिस स्पर्धेद्वारे मुख्य ग्रँडस्लॅम कारकीर्दीला सुरुवात केली. विम्बल्डन, शांघाय मास्टर्स या स्पर्धेतही तो सहभागी झाला. परंतु पहिल्या अथवा दुसऱ्या फेरीचा अडथळा ओलांडणे त्याला जमले नाही. २०१८मध्ये कॅनडा टेनिस स्पर्धेत थीएम, जोकोव्हिच, जुआन मार्टिन डेल पोत्रो आणि केव्हिन अँडरसन यांसारख्या खेळाडूंना सलग चार सामन्यांत धूळ चारून त्सित्सिपासने धडाका केला. मात्र येथेही अंतिम फेरीत त्याला नदालने नमवले. वर्षांच्या अखेरीस मात्र त्याने स्टॉकहोम बंदिस्त स्पर्धेद्वारे कारकीर्दीतील पहिलेवहिले विजेतेपद मिळवले.

त्सित्सिपासचे नाव विश्वाच्या कानाकोपऱ्यात पोहोचवणारी कामगिरी जानेवारी २०१९मध्ये घडली. ज्या खेळाडूला आदर्श मानून टेनिस कारकीर्दीची सुरुवात केली, त्या फेडररलाच ऑस्ट्रेलियन ग्रँडस्लॅममध्ये पराभूत करून त्सित्सिपास प्रकाशझोतात आला. दुर्दैवाने पुढे त्याला उपांत्य फेरीत पराभव पत्करावा लागला. मात्र स्वत: फेडररनेच कौतुक केल्यामुळे त्सित्सिपासची कामगिरी अधिक उंचावली. इस्टोरील आणि मार्सेले या स्पर्धाचेही त्याने या वर्षी विजेतेपद मिळवले. तर गेल्या आठवडय़ात एटीपी अंतिम टप्प्यासह वर्षांतील तिसरे विजेतेपद मिळवून त्याने टेनिसविश्वाला नव्या ताऱ्याचा उदय झाल्याची जाणीव करून दिली.

कोरियातील घटनेमुळे धडा

वयाच्या आठव्या वर्षी कोरियामध्ये कुटुंबीयांसह सहलीसाठी गेलेला असताना त्सित्सिपास बुडताना वाचला. त्या वेळी दूर किनाऱ्यावर बसलेल्या कुटुंबीयांची नजर चुकवून त्सित्सिपास मजा लुटण्यासाठी खोल पाण्यात गेला. परंतु पाण्याच्या पातळीमुळे त्याला स्वत:ला सावरणे कठीण गेले. ‘‘देवाच्या कृपेने आजूबाजूच्या माणसांनी वेळीच मला साहाय्य केल्यामुळे मी बचावलो. परंतु त्या घटनेमुळे मला आयुष्यात फार मोठा धडा मिळाला,’’ असे त्सित्सिपास या प्रसंगाविषयी सांगतो.

संपूर्ण कुटुंबात टेनिसपटूंचाच भरणा त्सित्सिपासचे वडील अपोस्टोलोस आणि आई जुलिया हे दोघेही आंतरराष्ट्रीय टेनिसपटू होते. तर पेट्रोस, पावलोस आणि इलासेव्हीट ही त्सित्सिपासची तिन्ही लहान भावंडेसुद्धा टेनिसमध्येच कारकीर्द घडवत आहेत. त्यामुळे लवकरच आंतरराष्ट्रीय पातळीवर त्सित्सिपास कुटुंबीयांचे चौरस चाहत्यांना पाहायला मिळू शकते.

rushikesh.bamne@expressindia.com