अ‍ॅशेसच्या दोन्ही डावांत शतके नोंदवणारा पाचवा फलंदाज

चेंडू फेरफारप्रकरणी बंदी उठल्यानंतरच्या पहिल्याच कसोटीत स्टीव्ह स्मिथने दुसऱ्या डावातही शतक नोंदवण्याचा पराक्रम केला. त्याने १४२ धावांची झुंजार खेळी साकारत ट्रॅव्हिस हेड आणि मॅथ्यू वेड (८६*) यांच्यासोबत दोन भक्कम शतकी भागिदाऱ्या केल्या. त्यामुळे अ‍ॅशेस कसोटी मालिकेच्या चौथ्या दिवशी ऑस्ट्रेलियाने ५ बाद ३५६ अशी दमदार मजल मारली होती. ऑस्ट्रेलियाच्या खात्यावर आता २६६ धावांची आघाडी जमा आहे.

चौथ्या दिवशी स्मिथने हेडसोबत चौथ्या गडय़ासाठी १३० धावांची बहुमोल भागीदारी रचली. अर्धशतक पूर्ण केल्यानंतर बेन स्टोक्सने हेडला फार काळ खेळपट्टीवर टिकू दिले नाही. यष्टीरक्षक जॉनी बेअरस्टोकरवी त्याला झेलबाद केले आणि ही जोडी फोडली.

मग स्मिथने वेडसोबत पाचव्या गडय़ासाठी १२६ भागीदारी साकारली. उपाहारानंतर दुसऱ्या सत्रातील दुसऱ्याच षटकात स्टुअर्ट ब्रॉडला चौकार खेचून स्मिथने दुसऱ्या डावातही शतक साकारले. त्याने पहिल्या डावात १४४ धावांची शतक खेळी उभारत ऑस्ट्रेलियाचा डाव सावरताना झोकात पुनरागमन केले होते. शतकानंतर दीडशतकाकडे तो आत्मविश्वासाने कूच करीत असताना ख्रिस वोक्सच्या उजव्या यष्टीबाहेर जाणाऱ्या चेंडूवर स्मिथ चकला आणि यष्टीरक्षक बेअरस्टोकडे झेल देऊन माघारी परतला. २०७ चेंडूंत १४ चौकारांसह त्याने १४२ धावांची खेळ उभारली.

२५वे शतक नोंदवणारा दुसरा वेगवान फलंदाज

कसोटी क्रिकेटमध्ये २५व्या शतकाची नोंद करणारा स्मिथ हा दुसरा वेगवान फलंदाज ठरला आहे. त्याने ११९व्या डावात हे यश मिळवले. या यादीतील पहिले स्थान ६८ डावांत २५वे शतक साकारणाऱ्या डॉन ब्रॅडमन यांच्या नावावर अबाधित आहे. विराट कोहलीने १२७व्या डावांत २५वे शतक नोंदवले होते.

अ‍ॅशेस कसोटीमधील दोन्ही डावांमध्ये शतक झळकावणारा

तो ऑस्ट्रेलियाचा पाचवा फलंदाज ठरला आहे. याआधी वॉरेन ब्रॅडस्ले (१९०९), आर्थर मॉरिस (१९४६-४७), स्टीव्ह वॉ (१९९७) आणि मॅथ्यू हेडन (२००२-०३) यांनी हा पराक्रम साकारला आहे.