Lalit Modi: ललित मोदी यांनी इंडियन प्रीमियर लीग स्पर्धेची सुरूवात केली. ही स्पर्धा जगातील सर्वात यशस्वी क्रिकेट लीग स्पर्धांपैकी एक आहे. या स्पर्धेने बीसीसीआयला मालामाल केलं. यासह अनेक दिग्गज खेळाडू देखील दिले. भारतीय क्रिकेटला वाट दाखवण्यात आयपीएलचा मोलाचा वाटा आहे. आता ललित मोदी यांनी वनडे क्रिकेट बंद करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. यासह कसोटी क्रिकेटला डे-नाईट स्वरूपात खेळवण्यात यावं असा प्रस्ताव ठेवला आहे.

ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार मायकल क्लार्कला दिलेल्या मुलाखतीत ललित मोदी म्हणाले, ” जर तुम्ही दिवसा कसोटी क्रिकेट खेळवणार असाल, तर लवकरच कसोटी क्रिकेटचा शेवट होईल. माझ्या मते वनडे क्रिकेट बंद करायला हवं. कसोटी आणि टी-२० मालिकेची द्विपक्षीय मालिका व्हायला हवी. आता लोकं आधीसारखं मैदानात येऊन ८ तास बसू शकत नाहीत. त्यामुळे दररोज स्टेडियम भरणं कठीण आहे. माझ्या मते, कसोटी सामना दुपारी २ वाजता सुरू व्हायला हवा.”

यासह मायकल क्लार्कसोबत चर्चा करताना ललित मोदी यांनी आयसीसीला आणखी एक मोलाचा सल्ला दिला आहे. ते म्हणाले, “वर्ल्डकप स्पर्धेची संख्या कमी करायला हवी आणि ऑलिम्पिकवर लक्ष केंद्रित करायला हवं. दर ४ वर्षांनी वर्ल्डकप होतो. वर्ल्ड टेस्ट चॅम्पिनयशिपचं संपूर्ण जगभरात आयोजन करायला हवं. वनडे वर्ल्डकपवर पैसा वाया घालवू नका.”

सध्या जगभरात टी-२० क्रिकेट लीग स्पर्धेची क्रेझ आहे. टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटला २००५ मध्ये सुरूवात झाली. त्यानंतर २००७ मध्ये पहिल्या टी-२० वर्ल्डकपचे आयोजन केले गेले होते. २००८ मध्ये ललित यादव यांनी इंडियन प्रीमियर लीग स्पर्धेला सुरूवात केली. या स्पर्धेत जगभरातील सर्व खेळाडूंना एकत्र खेळण्याची संधी दिली गेली होती. सध्या ही स्पर्धा जगातील सर्वात यशस्वी स्पर्धेपैकी एक आहे. दरम्यान आयसीसी ललित मोदी यांचा सल्ला ऐकणार का? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. कसोटी क्रिकेटचा रोमांच आणखी वाढवण्यासाठी आयसीसीने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेला सुरूवात केली. दरम्यान आता वनडे क्रिकेटला वाचवण्यासाठी आयसीसी आणखी काय प्रयत्न करणार? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.