फिफा विश्वचषक स्पर्धेत इटलीच्या जॉर्जियो चिएलिनीच्या खांद्यावर घेतलेला चावा उरुग्वेचा स्टार खेळाडू लुइस सुआरेझला चांगलाच महागात पडला आहे. या प्रकारात दोषी आढळल्यामुळे आंतरराष्ट्रीय फुटबॉल महासंघाने (फिफा) सुआरेझवर चार महिन्यांची बंदी घातली आहे.
या बंदीमुळे सुआरेझला पुढील चार महिने कोणत्याही स्पर्धेत खेळता येणार नाही. त्यामुळे इंग्लिश प्रीमिअर लीगच्या सुरुवातीच्या नऊ सामन्यांना त्याला मुकावे लागणार आहे. तसेच उरुग्वेच्या नऊ सामन्यांमध्येही त्याला खेळता येणार नाही. त्यामुळे पुढील वर्षी होणाऱ्या कोपा अमेरिकास्पर्धेत त्याला उरुग्वेचे प्रतिनिधित्व करता येणार नाही. त्याचबरोबर त्याला १ लाख १२ हजार डॉलरचा दंडही ठोठावण्यात आला आहे. त्याच्यावरील ही बंदी तात्काळ लागू होणार असल्यामुळे तो शनिवारी कोलंबियाविरुद्ध होणाऱ्या उरुग्वेच्या सामन्यात खेळू शकणार नाही. त्याला विश्वचषक स्पर्धेदरम्यान कोणत्याही स्टेडियमवर येण्यासही मज्जाव करण्यात आला आहे. लिव्हरपूलच्या सराव शिबिरात सहभागी होण्यापासूनही त्याला रोखण्यात आले आहे.
इटलीविरुद्धच्या महत्त्वपूर्ण सामन्यात सुआरेझने दुसऱ्या सत्रात चिएलिनीचा चावा घेतला. पण रेफ्रींना हा प्रकार पाहता न आल्यामुळे सुआरेझला लाल कार्ड मिळाले नव्हते. ‘‘जगभरातील असंख्य चाहत्यांच्या नजरा या सामन्यावर खिळल्या होत्या. त्यामुळे अशा प्रकारचे कृत्य फिफा विश्वचषकात कधीही खपवून घेतले जाणार नाही,’’ असे फिफाच्या शिस्तपालन समितीचे अध्यक्ष क्लॉडियो सल्सेर यांनी सांगितले.
प्रतिस्पध्र्याला चावल्याप्रकरणी सुआरेझला तिसऱ्यांदा बंदीची शिक्षा भोगावी लागली आहे. चेल्सीचा बचावपटू ब्रानिस्लाव्ह इव्हानोव्हिकला चावल्यामुळे त्याच्यावर १० सामन्यांची बंदी आली होती. ‘‘सुआरेझ आणि उरुग्वे संघ या बंदीविरोधात अपील करू शकतो. पण त्याचा लिव्हरपूल क्लब या बंदीविरोधात आव्हान देऊ शकणार नाही,’’ असे फिफाच्या प्रवक्त्या डेलिया फिशर म्हणाल्या.
उरुग्वेकडून पाठराखण
रिओ द जानिरो : इटलीच्या जॉर्जियो चिएलिनीचा चावा घेऊन जगभरातील तमाम फुटबॉलप्रेमींच्या टीकेचा धनी बनलेल्या उरुग्वेच्या लुइस सुआरेझची मात्र देशवासीयांनी पाठराखण केली आहे. उरुग्वेचे प्रशिक्षक आणि चाहत्यांनी थेट परदेशी प्रसारमाध्यमे, इटलीचे खेळाडू यांच्यावरच हल्ला चढवला आहे. ‘‘लुइस हा उरुग्वेसाठी काय करू शकतो, हे सर्वानाच ठाऊक आहे. म्हणूनच आम्ही त्याच्या पाठीशी ठामपणे उभे आहोत. सामन्यादरम्यान तो जेव्हा पडत होता, तेव्हा इटलीचे खेळाडू त्याचा अपमान करण्याचा प्रयत्न करत होते. इतकेच नव्हे तर राखीव खेळाडूही त्याला मारण्यासाठी धावत होते. इटली आणि ब्रिटिश प्रसारमाध्यमांनी त्याच्याविरोधात कटकारस्थान रचल्यामुळेच त्याच्याकडून चावा घेण्यासारखा प्रकार घडला’’ असे विल्मार वाल्डेझ यांनी ‘टेनफिल्ड डॉट कॉम’वरील लेखात म्हटले आहे.