भारतीय संघाचा गोलरक्षक सुब्रतो पॉल आणि मधल्या फळीतील फुटबॉलपटू सय्यद रहीम नाबीचा आगामी इंडियम सुपर लीगसाठी मुंबई संघात समावेश करण्यात आला आहे. बचावपटू निर्मल छेत्री आणि गौरमांगी सिंग यांना अनुक्रमे केरळ ब्लास्टर्स आणि बंगळुरू संघाने करारबद्ध केले.
गेल्या तीन वर्षांत भारतीय संघातून खेळलेल्या ३२ खेळाडूंवर मंगळवारी बोली लावण्यात आली. उर्वरित ४२ भारतीय खेळाडूंवर बुधवारी बोली लावण्यात येणार आहे.
अव्वल दर्जाच्या भारतीय खेळाडूंसाठी ८० लाख तर अन्य खेळाडूंसाठी ७५ लाख अशी बोलीची रक्कम ठेवण्यात आली आहे. पण कोणत्या खेळाडूला किती रकमेला करारबद्ध करण्यात आले, हे उघड करण्यात आले नाही.
आयएसएलचा भारतीय फुटबॉलला धोका नाही -भूतिया
मुंबई : इंडियन सुपर लीगमध्ये फुटबॉलपटूंना मिळणाऱ्या कराराच्या रकमेबाबत भारतीय संघाचा माजी कर्णधार बायच्युंग भूतिया फारसा समाधानी नसला तरी या स्पर्धेमुळे भारतीय फुटबॉलला कोणताही धोका पोहोचणार नाही, असे त्याने स्पष्ट केले. भूतिया म्हणाला, ‘‘खेळाडूंना यापेक्षा अधिक पैसे मिळायला हवे होते. खेळाडूंवर योग्य पद्धतीने बोली लागायला हवी होती. पण भारतीय फुटबॉलसाठी ही चांगली सुरुवात म्हणावी लागेल. आयएसएलमुळे भारतीय फुटबॉलला लगेच चांगले दिवस येतील, असे मी म्हणणार नाही. पण आयएसएलचा भारतीय खेळाडूंना चांगलाच फायदा होईल.’’
परदेशी खेळाडूंचा लिलाव पुढील महिन्यात
मुंबई : ब्राझील आणि कोलंबिया या फुटबॉलमधील महासत्ता समजल्या जाणाऱ्या दक्षिण अमेरिकेतील खंडातील तसेच युरोपियन खंडातील फुटबॉलपटूंचा इंडियन सुपर लीगसाठीचा लिलाव पुढील महिन्यात होणार आहे. ‘‘पुढील महिन्यात होणाऱ्या लिलावासाठी ४९ परदेशी खेळाडूंचा समावेश असणार आहे. या खेळाडूंपैकी सात खेळाडूंना संघात थेट करारबद्ध करण्याचा पर्याय आम्ही फ्रँचायझींसमोर ठेवला आहे. परदेशी खेळाडूंना करारबद्ध करताना ट्रान्सफर विंडोद्वारे आंतरराष्ट्रीय फुटबॉल महासंघाची (फिफा) परवानगी घ्यावी लागणार आहे,’’ असे आयएसएलचे संयोजक असलेल्या आयएमजी-आर ग्लोबल फुटबॉलचे उपाध्यक्ष अँडी नी यांनी सांगितले.