डायव्हिंग हा अतिशय विलोभनीय व जागतिक स्तरावर भरपूर पदके मिळविण्याचा क्रीडा प्रकार असला, तरी या खेळात आपल्याकडे अजूनही अपेक्षेइतके लक्ष दिले जात नाही. या खेळाबाबत आपल्या पाल्यांमध्ये असलेले क्रीडा नैपुण्य लक्षात घेऊन त्यांच्या विकासावर भर देण्यासाठी सोलापुरातील काही पालकांनी एकत्र येऊन श्री अ‍ॅक्वेटिक क्लबची स्थापना केली. या क्लबमधील खेळाडूंनी भारताला आंतरराष्ट्रीय स्तरावर अनेक पदकांची कमाई करून दिली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आपल्या देशात बहुंताश ठिकाणी डायव्हिंगसाठी स्वतंत्र तलाव उपलब्ध नाही. जलतरण तलावावर पोहण्याचा सराव संपल्यानंतर डायव्हिंगच्या खेळाडूंना सरावाची संधी मिळते. काही वेळ भर उन्हात त्यांना सराव करावा लागतो. तसेच अनेक ठिकाणी डायव्हिंगसाठी आवश्यक असणारे चांगल्या दर्जाचे बोर्ड नसतात, सुरक्षा यंत्रणा उपलब्ध नसते. अशा अनेक अडचणींवर मात करीत डायव्हिंगपटू कारकीर्द घडवत असतात. श्री अ‍ॅक्वेटिक क्लबच्या खेळाडूंची काही वेगळी स्थिती नाही. या क्लबच्या खेळाडूंनी अनेक अडचणींवर मात करीत राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर भरपूर पदकांची लयलूट केली आहे. त्यांच्या संघातील यशस्विनी नारायणपेठकर व पूनम शहा यांना शिवछत्रपती पुरस्कार मिळाला आहे. १५ खेळाडूंनी आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचे प्रतिनिधित्व केले आहे. तृष्णा पटेल, जागृती साखरकर, बिल्वा गिराम, ओम अवस्थी, रिया मुस्तारी, संकेत ढोले, निहाल गिराम, वरुण पै आदी खेळाडूंनी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील अनेक स्पर्धामधील पदकांवर आपले नावही कोरले आहे. त्याचप्रमाणे आशियाई वयोगट स्पर्धा, आंतरराष्ट्रीय शालेय क्रीडा स्पर्धा, राष्ट्रीय स्तरावरील शालेय व खुल्या क्रीडा स्पर्धामध्ये श्री क्लबच्या खेळाडूंनी सातत्यपूर्ण कामगिरी केली आहे. सोलापूर येथील डायव्हिंगबाबत असलेल्या मर्यादांमुळे अनेक वेळा हे खेळाडू स्पर्धेच्या ठिकाणी थोडे दिवस अगोदर जाऊन तेथे सराव करतात. त्यामुळे त्यांचा आत्मविश्वास वाढतो व त्याचा फायदा कामगिरी उंचावण्यासाठीही होत असतो.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Summer olympic sport diving
First published on: 21-04-2017 at 03:11 IST