परीक्षांच्या ताणातून लहान मुलांना जरा उसंत मिळाली की, पालकांचा रेटा लागतो तो शिबिरात सहभाग घेण्याचा. मुलांचा रिकामा वेळ सत्कर्मी लागावा, हा एकमेव उद्देश यामागे असतो. परंतु या शिबिरांनंतर काय, याचा विचार अनेकदा होताना दिसत नाही. दोन महिन्यांच्या या शिबिरात क्रिकेट प्रशिक्षण घेऊन कुणी सचिन तेंडुलकर बनणार नाही, तसेच बॅडमिंटन शिकून सायना नेहवालही होणे नाही. पण या शिबिरांमधून एक बाब नक्की शिकता येते आणि ती आयुष्यभरासाठी आपल्या सोबत राहते, ती म्हणजे शिस्त. सकाळी लवकर उठणे, व्यायाम करणे, विविध गटांतील आणि समाजातील मुलांशी संवाद वाढवणे, हे या शिबिरांमधून सहज शिकता येते आणि त्याचाच आपल्या व्यक्तिमत्त्व विकासासाठी फायदा होतो.
  या शिबिरांत एकाच छताखाली विविध संस्कृतीची मुले प्रशिक्षणासाठी येतात आणि त्यामुळे प्रत्येकाची संस्कृती जाणून घेण्याची संधी त्यांना लहानपणापासूनच मिळते. त्यातून संवाद क्षमता वाढते. जर एखादे शिबीर शिस्तीसाठी आग्रही असेल, तर त्याचा फायदा नक्की या मुलांना होतो. शाळेला सुट्टी म्हणजे आळसपणाला आमंत्रण. पण या शिबिरांच्या माध्यमातून सकाळी लवकर उठण्याची सवय सुटीतही कायम राहते आणि पुढील अभ्यासक्रमाकरिता ती उपयोगी ठरते. व्यायामाची सवयही शिबिरांतून लागते. सातत्य ठेवणारी कुठलीही गोष्ट शिकल्यास त्याचा व्यक्तिमत्त्व विकासाला नक्की फायदा होतो.
संकलन : स्वदेश घाणेकर

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

खेळांच्या शिबिरांमधून व्यक्तिमत्त्व विकास नक्की होतो, मात्र त्यासाठी काही निकष आहेत. शिबिरांमध्ये शिकवल्या जाणाऱ्या बाबी एका विशिष्ट पद्धतीने असल्या तरच हा विकास होईल. त्यातला एक महत्त्वाचा भाग म्हणजे शिस्त. एका विशिष्ट वेळेला शिबिराची सुरुवात होणे, विशिष्ट वेळेला संपणे आणि शिबिरामध्ये जे काही शिकवले जाते, त्याचे नीट आयोजन असणे आणि त्याचे एक वेळापत्रक तयार करून ते मुलांनाही माहीत असणे महत्त्वाचे आहे.  
– नीता ताटके, क्रीडा मानसोपचारतज्ज्ञ
आपल्या घरातून होणाऱ्या संस्कारांतूनच व्यक्तिमत्त्व विकासाची जडणघडण होते. शिबीर हे एक माध्यम आहे. शिबिरांमध्ये विविध संस्कृतीच्या मुलांचा सहभाग असतो. त्यांच्याकडून अनेक गोष्टी आपल्याला नव्याने प्रत्ययास येतात, परंतु त्यातून काय चांगले निवडायचे आहे, हे आपल्या संस्कारांवरच अवलंबून आहे.
अनुराधा डोणगावकर, कबड्डी प्रशिक्षक

शिबिरात सहभाग घेताना याचा विचार करा
*शिबिराची वेळ आणि त्या वेळेत ते सुरू होते की नाही, याची खात्री करा
*शिबिरातील ज्या कृती शिकवल्या जातात त्या तात्कालिक स्वरूपाच्या नसाव्यात
*आयोजकांकडून शिबिरार्थीना प्रोत्साहन मिळते का, हे तपासणे
*बाहेरगावी नेण्याच्या शिबिराची संपूर्ण चौकशी करणे आवश्यक आहे. हे शिबीर केवळ पैसा कमविण्यासाठी नाही ना, याची खात्री करणे
*आयोजक कोण आहेत, त्यांचे ध्येय काय आहेत. या आधी त्यांनी आयोजित केलेल्या शिबिरांची माहिती घेणे
*प्रशिक्षक कोण आहेत, एका विद्यार्थ्यांमागे किती प्रशिक्षक आहेत, याची माहिती घेणे

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Summer vacation sports camps
First published on: 20-04-2015 at 02:09 IST