scorecardresearch

रविवार विशेष : विम्बल्डनवारी

‘‘मला विम्बल्डनसारख्या स्पर्धेत न खेळणे आवडणार नाही, तर कोणत्याही खेळाडूला विम्बल्डनला मुकावे असे वाटणार नाही,’’ हे वक्तव्य पुरुष एकेरीतील सर्वाधिक ग्रँडस्लॅम विजेत्या राफेल नदालने केले आहे.

nadal jocovich (1)
स्पेनचा राफेल नदाल -सर्बियाचा नोव्हाक जोकोव्हिच

संदीप कदम

‘‘मला विम्बल्डनसारख्या स्पर्धेत न खेळणे आवडणार नाही, तर कोणत्याही खेळाडूला विम्बल्डनला मुकावे असे वाटणार नाही,’’ हे वक्तव्य पुरुष एकेरीतील सर्वाधिक ग्रँडस्लॅम विजेत्या राफेल नदालने केले आहे. त्याच्या या वक्तव्यावरून स्पर्धेचे महत्त्व अधोरेखित होते. सफेद गणवेश परिधान केलेले खेळाडू, वातावरणातील प्रसन्नता आणि टेनिस चाहते ताज्या चेरींचा घेत असलेला आस्वाद. हे सर्व चित्र विम्बल्डनमध्ये पाहायला मिळते,  हिरवळीवरील टेनिसच्या या महासंग्रामाला २७ जूनपासून सुरुवात होणार आहे.

युक्रेन आणि रशियामध्ये सुरू असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर विम्बल्डन स्पर्धेचे आयोजक असणाऱ्या ऑल इंग्लंड क्लबने रशिया व बेलारुसच्या खेळाडूंवर खेळण्यास बंदी घातली. या निर्णयामुळे यंदा ही स्पर्धा चर्चेत आहे. याला प्रत्युत्तर म्हणून पुरुष आणि महिलांच्या टेनिस संघटनेने या वर्षी स्पर्धेत क्रमवारीचे कोणतेही गुण मिळणार नसल्याचे स्पष्ट केले. त्यामुळे ही स्पर्धा आता केवळ प्रेक्षणीय असेल. तरीही या स्पर्धेच्या जेतेपदासाठी अनेक नामांकित खेळाडू आपले सर्वस्व पणाला लावून खेळतील, अशी अपेक्षा आहे. या वर्षी पहिल्यांदाच स्पर्धेत रविवारी सामने होतील. रविवारी ३ जुलैला विम्बल्डनच्या सेंटर कोर्टला १०० वर्षे पूर्ण होणार आहेत. या वेळी विम्बल्डनमध्ये २२ ग्रँडस्लॅम जेतेपद जिंकणारा स्पेनचा राफेल नदाल आणि सात वेळा विम्बल्डन जेतेपद मिळवणारा सर्बियाचा नोव्हाक जोकोव्हिच या दोन खेळाडूंमधील द्वंद्व पाहण्यासाठी चाहते उत्सुक असतील. जोकोव्हिचला स्पर्धेसाठी अग्रमानांकन देण्यात आले आहे, तर नदालला दुसरे स्थान देण्यात आले आहे.

रशियाच्या खेळाडूंवर स्पर्धा विम्बल्डनमध्ये बंदी घातल्याने अग्रमानांकित डॅनिल मेदवेदव स्पर्धेत सहभागी होणार नाही. दुसऱ्या स्थानावरील अ‍ॅलेक्झांडर झ्वेरव्हने दुखापतीमुळे माघार घेतली आहे.  नुकतेच नदालने फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेचे १४वे जेतेपद मिळवले. त्यामुळे नदालचा आत्मविश्वास दुणावला आहे, तर गवताच्या कोर्टवर सलग चौथे जेतेपद मिळवण्याचा जोकोव्हिचचा मानस असेल. सध्याची लय पाहता नदालचे पारडे जड वाटत आहे. शुक्रवारी जाहीर करण्यात आलेल्या कार्यक्रमपत्रिकेत या दिग्गज खेळाडूंचा समावेश दोन वेगवेगळय़ा गटांत करण्यात आल्याने त्यांनी आपली लय कायम ठेवल्यास ते अंतिम फेरीत एकमेकांसमोर असू शकतील.

आठवे मानांकन मिळालेल्या माटेओ बेरेट्टिनीकडेही सर्वाचे लक्ष असेल. तारांकित खेळाडू रॉजर फेडरर अजूनही आपल्या गुडघ्याच्या दुखापतीतून सावरलेला नाही. स्थानिक खेळाडू अँडी मरे या वेळी चांगली कामगिरी करण्यास उत्सुक असेल. नदाल आणि जोकोव्हिचसारख्या खेळाडूंना पुढच्या पिढीतील स्पेनचा पाचवा मानांकित कार्लोस अल्कराझ आणि फ्रेंच टेनिस स्पर्धेची अंतिम फेरी गाठणारा नॉर्वेचा कॅस्पर रुड आव्हान उपस्थित करतील.

महिलांमध्ये २३ ग्रँडस्लॅम विजेत्या सेरेना विल्यम्सच्या सहभागामुळे चुरस वाढली आहे. या स्पर्धेत ती बिगरमानांकित खेळाडू म्हणून उतरेल. विम्बल्डनच्या गेल्या हंगामात पहिल्या फेरीच्या सामन्यातून माघार घ्यावी लागल्यानंतर सेरेना स्पर्धात्मक टेनिसमध्ये सहभागी झाली नव्हती. काही वर्षांपूर्वी सेरेनाचा महिला एकेरी टेनिसमध्ये दबदबा होता. मात्र आई झाल्यानंतर काही काळ ती खेळापासून दूर झाली. नंतर पुनरागमन करण्याचे प्रयत्न तिने केले, पण दुखापतींनी तिची वाट रोखली. सेरेनाला  सूर गवसला आणि आगेकूच केली, तर उपांत्य फेरीत तिचा सामना अग्रमानांकित इगा श्वीऑनटेकशी होऊ शकतो. यासह तिने विम्बल्डनची सराव स्पर्धा समजल्या जाणाऱ्या इस्टबर्न स्पर्धेत टय़ुनिशियाच्या ओन्स जाबेऊरसह दुहेरीत सहभाग नोंदवला. जाबेऊरलाही या स्पर्धेत तिसरे मानांकन देण्यात आले आहे, मे महिन्यात तिने माद्रिद खुल्या टेनिस स्पर्धेचे जेतेपद मिळवत सर्वाचे लक्ष वेधले होते.

पोलंडच्या श्वीऑनटेकने गेल्या महिन्यात फ्रेंच टेनिस स्पर्धेचे जेतेपद मिळवले होते. तसेच सलग ३५ सामने जिंकत तिने व्हिनस विल्यम्सची बरोबरी केली आहे. हा विक्रम मोडीत काढण्याची संधी तिला या स्पर्धेत असणार आहे. तर, सेरेनाचे लक्ष्य हे मार्गरेट कोर्टच्या २४ ग्रँडस्लॅम जेतेपदाच्या विक्रमाकडेही असेल. जपानची आघाडीची टेनिस खेळाडू नाओमी ओसाकानेही या वेळी दुखापतीमुळे स्पर्धेतून माघार घेतली आहे. फ्रेंच टेनिस स्पर्धेतील युवा खेळाडू कोको गॉफची कामगिरी पाहता तिच्याकडून चांगल्या खेळाची अपेक्षा असेल. १०व्या मानांकित एमा राडूकानूवरही नजरा असतील, अ‍ॅश्ले बार्टीने घेतलेल्या निवृत्तीनंतर श्वीऑनटेकच्या वरचढ कामगिरी करणाऱ्या खेळाडूलाच महिला एकेरीचे जेतेपद मिळेल.

मराठीतील सर्व क्रीडा ( Krida ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Sunday special wimbledon competition player grand slam winners raphael nadal ysh

ताज्या बातम्या