प्रेक्षकांचा प्रचंड पाठिंबा लाभलेल्या वातावरणात भारताने बांगलादेशविरुद्धची लढत २-२ अशी बरोबरीत सोडवली. पराभवाची नामुष्की टाळत बरोबरी करून देण्यात निर्णायक भूमिका बजावली ती भारताचा कर्णधार सुनील छेत्रीने. सुनीलने १४व्या आणि ९२व्या मिनिटाला गोल नोंदवले. अतिरिक्त वेळेत सुनीलने गोल करताच नेहरू स्टेडियमवर जमलेल्या भारतीय पाठीराख्यांनी एकच जल्लोष केला.
विम कोव्हरमन्स यांच्या डावपेचांनुसार रॉबिन सिंगने आक्रमणाची धुरा सांभाळली. मोंडल आणि ऐबोरलाँग खोंगजी यांच्याकडे बचावाची जबाबदारी होती. फुलबॅक्सच्या भूमिकेत डेन्झिल फ्रान्को व नारायण दास होते. मेहताब हुसेनकडे मध्यरक्षणाची जबाबदारी होती. सामना सुरू झाल्यानंतर दहा मिनिटांतच भारताला गोलची संधी मिळाली. फ्रान्सिस फर्नाडिझने दोन्ही गोलसाठी अनुकूल परिस्थिती निर्माण केली. फ्रान्सिसच्या पासवर रॉबिन सिंगने सुरेख गोल केला, मात्र सामनाधिकाऱ्यांनी ऑफसाइड दर्शवल्यामुळे भारताची संधी हुकली. सुनील छेत्रीने चेंडूवर ताबा मिळवत गोल केला. परंतु बांगलादेशचा गोलरक्षक शाहीदुल आलमने अभेद्य बचावाचे उदाहरण देत गोल होण्यापासून रोखले. याचा कोणताही परिणाम होऊ न देता सुनीलने १४व्या मिनिटाला शानदार गोल करत भारताची बोहनी केली. पाच मिनिटांनंतर रॉबिन सिंगने हेडरद्वारे गोल करण्याचा प्रयत्न चुकला. मध्यंतराला काही मिनिटे असताना रॉबिनचा आणखी एक प्रयत्न बांगलादेशचा गोलरक्षक आलमने हाणून पाडला.
मध्यंतरानंतर बांगलादेशने मध्यरक्षणात मॅमुनअल आणि सोहेल राणा यांनी चेंडूवर नियंत्रण मिळवले. भारतीय खेळाडूंनीही जोरदार प्रत्युतर देत मुकाबला रोमांचक केला. डेन्झिल फ्रॅन्को व राणा यांच्यादरम्यानचे चेंडूचे नियंत्रण सैलावले आणि बांगलादेशच्या मिथुन चौधरीने भारताचा गोलरक्षक सुब्रतो पॉलला गुंगारा देत चेंडू गोलपोस्टमध्ये धाडला.
६४व्या मिनिटाला अरनाब मोंडलने स्वयंगोल केल्याने बांगलादेशची गोलची आघाडी भक्कम झाली. या चुकीचा बांगलादेश फायदा उठवणार असे चित्र होते. भारताचे गोल करण्याचे सर्व प्रयत्न बांगलादेशचा गोलरक्षक आलम व बचावपटूंनी हाणून पाडले. अतिरिक्त वेळेत सुनील छेत्रीने अल्वीन जॉर्जच्या पासवर सुरेख गोल करत भारताला बरोबरी करून दिली.