Sunil Chhetri Announces Retirement: भारतीय स्टार फुटबॉलपटू सुनील छेत्रीने आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून निवृत्ती जाहीर केली आहे. सोशल मीडियावर एक भावुक करणारा व्हीडिओ पोस्ट करत त्याने आपल्या निवृत्तीची आपल्या चाहत्यांना माहिती दिली. या व्हीडिओमध्ये त्याने आपल्या प्रवासाबद्दल सांगितले आणि आता नवीन लोकांना संधी देण्याची वेळ आली आहे, असाही उल्लेख त्याने केला. सुनील छेत्री ६ जून रोजी कुवेतविरुद्ध शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना खेळणार आहे. ३९वर्षीय सुनील छेत्रीने भारताकडून खेळताना अनेक मोठे विक्रम आपल्या नावावर केले आहेत.
सुनील छेत्री हा भारतीय फुटबॉलचा चेहरा आहे. त्याने देशासाठी १५० सामन्यात ९४ गोल केले आहेत. तो सध्या आंतरराष्ट्रीय गोल करणाऱ्यांच्या यादीत चौथ्या क्रमांकावर आहे. निवृत्तीची घोषणा करताना छेत्रीने भारतासाठी फुटबॉल खेळण्याच्या प्रवासाच्या आठवणी सांगितल्या आणि सांगितले की मी माझा पहिला सामना खेळलो ते मला अजूनही आठवते. माझा पहिला सामना, माझा पहिला गोल, हा माझ्या प्रवासातील सर्वात संस्मरणीय क्षण होता. देशासाठी इतके सामने खेळू शकेन, असे मला कधीच वाटले नव्हते. निवृत्तीबद्दल सांगताना म्हणाला, जेव्हा त्याने निवृत्तीचा निर्णय घेतला तेव्हा त्याने सर्वप्रथम आई-वडील आणि पत्नीला याबद्दल सांगितले.
कुवेत आणि कतार विरुद्ध फिफा विश्वचषक २०२६ आणि AFC आशियाई चषक २०२७ साठी प्राथमिक संयुक्त पात्रतेच्या दुसऱ्या टप्प्यातील सामन्यांसाठी टीम इंडियाची नुकतीच घोषणा करण्यात आली. अ गटातील शेवटचे दोन सामने ६ जून रोजी कोलकातामध्ये कुवेत विरुद्ध खेळल्यानंतर भारतीय संघ ११ जून रोजी दोहा येथे कतारशी भिडणार आहे. भारत चार सामन्यांतून चार गुणांसह गटात दुसऱ्या स्थानावर आहे. गटातील अव्वल दोन संघ फिफा विश्वचषक पात्रता फेरीच्या तिसऱ्या फेरीसाठी पात्र ठरतील आणि AFC आशियाई चषक सौदी अरेबिया २०२७ मध्ये त्यांचे स्थान निश्चित करतील.
सुनील छेत्रीने १२ जून २००५ रोजी पाकिस्तानविरूद्धच्या सामन्यातून पदार्पण केले. या सामन्यातच त्याने पहिला आंतरराष्ट्रीय गोलही केला. छेत्रीने त्याच्या फुटबॉल कारकिर्दीत सहा वेळा एआयएफएफ प्लेयर ऑफ द इयर पुरस्कार जिंकला आहे. याशिवाय २०११ मध्ये अर्जुन पुरस्कार आणि २०१९ मध्ये पद्मश्री पुरस्कारांचा मानकरही ठरला.