भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या कारभारातील बेशिस्तपणा दूर व्हावा, यासाठी सर्वोच्च न्यायालयातर्फे नियुक्त केलेल्या लोढा समितीच्या शिफारशींबाबत भारताचे माजी कर्णधार सुनील गावस्कर यांनी असहमती दर्शवली आहे.

पुण्यात एका खासगी व्यावसायिक उपक्रमाचे सदिच्छादूत म्हणून गावस्कर यांची नियुक्ती झाली, त्या वेळी ते बोलत होते. पुण्यातल्या स्थानिक मुद्दय़ाचा आधार घेत त्यांनी बीसीसीआयला पाठिंबा दर्शवला. ‘‘न्यायालयाने हेल्मेट सक्ती लागू केल्यावरदेखील लोकांनी हेल्मेट घालणे सुरू केले का? मग लोढा समितीच्या शिफारशी बीसीसीआयने का मान्य कराव्यात,’’ असा प्रश्न गावस्कर यांच्याकडून विचारण्यात आला.

बीसीसीआयच्या अंदाधुंद कारभारावर अंकुश ठेवण्यासाठी लोढा समितीची स्थापना करण्यात आली होती. समितीच्या वतीने काही शिफारशी सुचविण्यात आल्या होत्या. त्यातील काही शिफारशींना बीसीसीआयचा विरोध आहे. यावरून बीसीसीआय व लोढा समिती यांच्यामध्ये संघर्ष सुरू आहे. यासंबंधी गावस्कर यांना विचारले असता ते म्हणाले, ‘‘न्यायालयाकडून दुचाकी चालकांना हेल्मेट सक्ती खूप आधीपासून करण्यात आली होती, परंतु न्यायालयाच्या त्या निर्णयाची अंमलबजावणी नागरिकांकडून केली जात नाही. तसेच लोढा समितीने दिलेला अहवाल बीसीसीआयने तरी कसा व का स्वीकारावा?’’

इंडियन प्रीमिअर लीग स्पर्धेतील स्पॉट-फिक्सिंग प्रकरणानंतर सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर गावस्कर यांनी आयपीएलच्या सातव्या हंगामाचे अध्यक्ष म्हणून काम पाहिले होते. लोढा समितीच्या शिफारशींची अंमलबजावणी झाल्यास प्रशासनाचा ढाचा बदलणार आहे. खेळाडूंसाठी हे प्रारूप उपयुक्त ठरणार आहे. शिफारशींना पाठिंबा देण्याऐवजी गावस्कर यांनी बीसीसीआयची पाठराखण केली आहे.

छोटय़ा गावांमधून सराव करणाऱ्या खेळाडूंविषयी गावस्कर म्हणाले, ‘‘छोटय़ा शहरातून अथवा गावामधून क्रिकेटचा सराव करून खेळाडू तयार होत आहेत ही अत्यंत चांगली गोष्ट आहे. आतापर्यंत भारतीय संघाला गावपातळीवरील चांगले खेळाडू मिळालेले आहेत.’’

पाचशे व हजाराच्या नोटा रद्द करण्याच्या निर्णयावर प्रतिक्रिया देताना गावस्कर म्हणाले, ‘‘पाचशे व हजाराच्या नोटा बंद करण्यात आल्या आहेत. या निर्णयाने देशातील जनता आनंदी झाली आहे. त्यामुळे या निर्णयावर जनता खूश आहे तर मीदेखील खूश आहे.’’