रिचर्ड्स, सेहवागनंतर शर्मा; सुनील गावस्कर यांनी केली स्तुती

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कसोटी क्रिकेटमध्ये भलेही रोहित शर्मा काहीसा अपयशी ठरला असेल, पण फलंदाजी आणि नेतृत्व या दोन्ही आघाडय़ांवर एकदिवसीय आणि ट्वेन्टी-२० क्रिकेटमध्ये रोहितचे नाणे एकदम खणखणीत वाजले आहे. वेस्ट इंडिजविरुद्धच्या दुसऱ्या ट्वेन्टी-२० सामन्यांत दमदार शतक झळकावून रोहितने ट्वेन्टी-२० या झटपट क्रिकेटमध्ये भारताकडून सर्वाधिक धावा करताना कर्णधार विराट कोहलीलाही मागे टाकले. रोहित शर्माच्या या कामगिरीची भारताचे महान फलंदाज सुनील गावस्कर यांनी मुक्तकंठाने प्रशंसा केली आहे.

गावस्कर यांनी रोहितची तुलना थेट वीरेंद्र सेहवागशी केली आहे. गावस्कर म्हणतात, ‘‘व्हिव्हियन रिचर्ड्स आणि सेहवागनंतर रोहित हा जगातील सर्वात स्फोटक फलंदाज ठरला आहे. सेहवागप्रमाणेच रोहितलाही रोखणे गोलंदाजांना अवघड जाते. सेहवागसारखीच रोहितची धावांची आणि शतकांची भूक जास्त आहे. एक चेंडू बाहेर फेकल्यानंतर दुसरा चेंडू मैदानाबाहेर भिरकावण्याचा सेहवागसारखाच रोहितचाही प्रयत्न असतो. वेस्ट इंडिजविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत रोहितने शानदार कामगिरी केली. आता ट्वेन्टी-२० मालिकाही त्यानेच गाजवली.’’

‘‘मर्यादित षटकांच्या क्रिकेटवर रोहितने ज्या प्रकारे अधिराज्य गाजवले आहे, त्या प्रकारे त्याने कसोटी क्रिकेटमध्येही हुकमत गाजवली तर तो रिचर्ड्स आणि सेहवागनंतरचा जगातील सर्वात स्फोटक फलंदाज ठरेल,’’ असेही गावस्कर यांनी म्हटले आहे. रोहितने या वर्षी एकदिवसीय क्रिकेटमध्ये ७३.५७च्या सरासरीने १०३० धावा केल्या असून ट्वेन्टी-२०मध्ये त्याने ५५६ धावा आपल्या खात्यात जमा केल्या आहेत. त्याचबरोबर कोहलीच्या अनुपस्थितीत त्याने भारताला निदाहास करंडक आणि आशिया चषकाचे जेतेपद मिळवून दिले आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारताने वेस्ट इंडिजविरुद्धची ट्वेन्टी-२० मालिकाही जिंकली आहे.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sunil gavaskar rohit sharma
First published on: 12-11-2018 at 01:33 IST