भारताचे माजी क्रिकेटपटू सुनील गावसकर यांनी भारतीय संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदासाठी अर्ज करण्याच्या राहुल द्रविडच्या निर्णयाचे स्वागत केले आहे. राहुल द्रविडने अधिकृतपणे प्रशिक्षकपदासाठी अर्ज केला आहे आणि याचा अर्थ असा आहे की आता कोणीही अर्ज करण्याची गरज नाही. कारण त्यांचा अनुभव पाहता त्यांची नियुक्ती होण्याची शक्यता जास्त आहे, असे सुनील गावस्कर यांनी म्हटले आहे.

अर्जा भरण्याच्या शेवटच्या दिवशी राहुल द्रविडने अर्ज दाखल केला. याचा अर्थ मुख्य प्रशिक्षकपदासाठी द्रविडची पहिली पसंती असेल आणि तो इतर अनेक अर्जदारांपेक्षा पुढे असणार आहे. द्रविडला प्रशिक्षक बनवल्यास राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचे काम सांभाळण्यासाठी व्हीव्हीएस लक्ष्मण किंवा अनिल कुंबळे यांची निवड केली जाऊ शकते.

बेंगळूरु येथील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचा (एनसीए) प्रमुख द्रविडने मुख्य प्रशिक्षकपदासाठी अर्ज केल्यामुळे भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) क्रिकेट सल्लागार समितीचे काम सोपे झाले आहे. द्रविडने प्रशिक्षकपद सांभाळावे अशी ‘बीसीसीआय’चा अध्यक्ष सौरव गांगुली आणि सचिव जय शाह यांचीही इच्छा आहे. अन्य कोणत्याही नामांकित व्यक्तीने या पदासाठी अर्ज केलेला नाही.

द्रविडचा विश्वासू सहकारी आणि भारताचा माजी वेगवान गोलंदाज पारस म्हांबरे यांनी सोमवारी गोलंदाजी प्रशिक्षकाच्या पदासाठी अर्ज केला होता. पारस हा द्रविडचा विश्वासू मित्रही मानला जातो. त्यांनी द्रविडसोबत राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये काम केले आहे.

दरम्यान, ४८ वर्षीय द्रविड सध्या बंगळुरुमधील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचे काम पाहत असून यापूर्वीही त्याने श्रीलंकेच्या दौऱ्यावर प्रशिक्षक म्हणून काम केल आहे. द्रविड १९ वर्षांखालील संघ आणि भारत अ संघाला प्रशिक्षणही देत आहे. अशाप्रकारे द्रविडला मुख्य संघाला प्रशिक्षण देण्यासाठी विचारणा झाल्याची ही काही पहिलीच वेळ नाही. मात्र द्रविडने तरुणांना क्रिकेटचे धडे देण्याला आणि राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचे काम पाहण्याला प्राधान्य दिले आहे. यापूर्वी द्रविडने २०१६ आणि २०१७ साली अशाच पद्धतीची ऑफर नाकारली होती.