नवव्या वर्षी टेबल टेनिस खेळायला सुरुवात केली. तालुका-जिल्हा, राज्य, विभागीय, आंतरराष्ट्रीय स्पर्धामध्ये चांगली कामगिरी केली होती, पदके पटकावली आहेत मात्र राष्ट्रीय जेतेपदावर नाव कोरता आले नव्हते. पाटण्यात झालेल्या स्पर्धेच्या निमित्ताने राष्ट्रीय जेतेपद पटकावले. हरमीत देसाईसारख्या दमदार प्रतिस्पध्र्याला नमवत या जेतेपदाची कमाई केली आहे, त्याचे समाधान आहे. माझ्या घरी वडील आणि भाऊ स्पर्धात्मक टेबल टेनिस खेळले आहेत तसेच प्रशिक्षणही देतात. आमचे कुटुंब क्रीडा क्षेत्राशी संबंधित आहे. राष्ट्रीय जेतेपदाचे महत्त्व त्यांना पुरेपूर ठाऊक होते. आपल्या मुलाने देशातील सर्वोच्च स्पर्धेचे जेतेपद मिळवावे असे त्यांचे स्वप्न होते. थोडे उशिरा का होईना पण आईवडिलांचे स्वप्न साकार करता आल्याने प्रचंड आनंद झाला आहे असे टेबल टेनिसचा राष्ट्रीय विजेता सनील शेट्टीने सांगितले.
पाटणा येथे झालेल्या वरिष्ठ राष्ट्रीय टेबल टेनिस स्पर्धेत हरमीत देसाईवर ११-९, ११-७, १०-१२, १२-१०, ७-११, ११-७ अशी मात करत सनीलने जेतेपदाचे स्वप्न प्रत्यक्षात साकारले. विशेष म्हणजे महाराष्ट्राला तब्बल १९ वर्षांनंतर हे जेतेपद मिळाले आहे. १९९५ साली कमलेश मेहता यांनी जेतेपद पटकावले होते. कमलेश मेहता आता भारताचे प्रशिक्षक आहेत. ‘मी सामना जिंकला त्यावेळी कमलेश सर स्वत: उपस्थित होते. त्यांच्यासमक्ष हे जेतेपद मिळवता आल्याचा आनंद अनोखा होता’, असे सनीलने सांगितले.
‘गेल्यावर्षी स्वीडनमध्ये अव्वल टेबल टेनिसपटू पीटर कार्लसन यांच्याकडून मार्गदर्शनाची संधी मिळाली होती. सामन्यात मोक्याच्या क्षणी मी कच खात असे आणि हातातोंडाशी आलेला विजय प्रतिस्पर्धी हिरावून घेत. मात्र कार्लसन सरांनी या मुद्यावरच भर देत मला कणखर बनवले. त्यांनी सांगितलेल्या सकारात्मक गोष्टींचा पाटण्यातील स्पर्धेत उपयोग झाला’, असे सनील सांगतो.
माझे पहिले प्रशिक्षक दीपक मानी यांची भूमिकाही महत्त्वाची आहे. मुंबईत परतल्यानंतर सरांसह ज्या ठिकाणी मी सराव करतो त्या अंधेरीच्या वायएमसीए केंद्रात सेलिब्रेशनचा बेत आखल्याचे सनीलने सांगितले. मात्र चार दिवसांतच इराण येथे होणार असलेल्या स्पर्धेसाठी रवाना व्हायचे असल्याने सरावाकडे लक्ष असणार आहे असे सनीलने सांगितले. याचवर्षी राष्ट्रकुल आणि आशियाई क्रीडा स्पर्धा होणार आहे. या स्पर्धेत सर्वोत्तम कामगिरी करण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे सनीलने सांगितले.
संग्रहित लेख, दिनांक 14th Jan 2014 रोजी प्रकाशित
राष्ट्रीय विजेतेपदानंतर टेबलटेनिसपटू सनील शेट्टी आनंदी : आईवडिलांचे स्वप्न साकार केले!
नवव्या वर्षी टेबल टेनिस खेळायला सुरुवात केली. तालुका-जिल्हा, राज्य, विभागीय, आंतरराष्ट्रीय स्पर्धामध्ये चांगली कामगिरी केली होती,

First published on: 14-01-2014 at 01:15 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sunil shetty remember his parent after winning table tennis national champions