या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

लोकांना मला नेहमीच कमी लेखण्याची सवय जडली आहे, पण त्याचा माझ्यावर कोणताच परिणाम होणार नाही. मला कमी लेखू नका. मी निवृत्ती पत्करत नसून चौथ्यांदा ऑलिम्पिकमध्ये सहभागी होण्यासाठी कसून सराव करत आहे, असे सांगत दोन ऑलिम्पिक पदके  पटकावणाऱ्या सुशील कुमारने आपल्या टीकाकारांना चपराक दिली आहे.

३६ वर्षीय सुशील टोक्यो ऑलिम्पिकचे पात्रता निकष पार करण्यासाठी झगडत आहे. मात्र करोना विषाणूमुळे ऑलिम्पिक स्पर्धा एका वर्षांने लांबणीवर पडल्याने सुशीलला ऑलिम्पिकमध्ये स्थान मिळवण्यासाठी नामी संधी मिळाली आहे. ‘‘सध्या मी सर्व स्पर्धामध्ये खेळणार नसून चांगल्या प्रकारे तयारी करणार आहे. दुखापतीपासून दूर राहिलात, चांगला सराव केलात आणि आपले ध्येय निश्चित केले तर कुस्ती या खेळात तुम्हाला ध्येयपूर्ती नक्कीच करता येते,’’ असे सुशीलने सांगितले.

तो म्हणाला, ‘‘मी सध्या दिवसातून दोन वेळा कसून सराव करत आहे. मॅटवर दोन हात करत नसलो तरी स्वत:ला सज्ज करण्यासाठी माझी धडपड सुरू आहे. मी नक्कीच टोक्यो ऑलिम्पिकसाठी पात्रता निकष पूर्ण करेन, असा विश्वास आहे.’’

सुशील कु मार ७४ किलो वजनी गटात सहभागी होत असून अद्याप भारताला या गटात ऑलिम्पिकचे स्थान मिळवता आलेले नाही. ‘‘२०११ मध्येही मला टीकाकारांनी हिणवले होते. त्यामुळे ही परिस्थिती कशी हाताळायची, याची मला पूर्ण कल्पना आहे. प्रत्येक दिवशी मी या परिस्थितीला तोंड देत आहे.’’

२००८ बीजिंग ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक मिळवल्यानंतर सुशील या कामगिरीची पुनरावृत्ती करेल की नाही, याबाबत शंका उपस्थित केली जात होती. पण २०१२ लंडन ऑलिम्पिकमध्ये सुशीलने रौप्यपदकावर मोहोर उमटवून टीकाकारांना चोख उत्तर दिले होते. २०१६ रिओ ऑलिम्पिकमध्ये नरसिंग यादवने भारतासाठी ऑलिम्पिकचे स्थान निश्चित के ले होते, पण नरसिंग उत्तेजक चाचणीत दोषी आढळल्यानंतर सुशील कु मारला सहभागी होण्याची संधी मिळाली होती. आता नरसिंगवरील चार वर्षांची बंदी उठल्यानंतर भारतीय कुस्ती महासंघाने (डब्ल्यूएफआय) त्याला खेळण्याची परवानगी दिली आहे.

नरसिंगबाबत सुशील म्हणाला, ‘‘नरसिंगला आपल्या कारकीर्दीची पुन्हा सुरुवात करण्याची संधी मिळाली, ही चांगली बाब म्हणावी लागेल. त्याला मी शुभेच्छा देतो. माझ्यासमोर असणाऱ्या आव्हानांवर मी लक्ष देऊन आहे. त्यामुळे ऑलिम्पिक पात्र ठरण्याकरिता मी जीवाचे रान करणार आहे.’’

सध्या मी सर्व स्पर्धामध्ये खेळणार नसून मोजक्याच स्पर्धासाठी चांगल्या प्रकारे तयारी करणार आहे. दुखापतीपासून दूर राहून सरावाचे योग्य नियोजन आखून आपले ध्येय निश्चित करणार आहे. या सर्व तयारीसह तुम्ही रिंगणात उतरलात की कुस्ती या खेळात तुम्हाला ध्येयपूर्ती नक्कीच करता येते.

– सुशील कुमार

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sushil kumars preparations for the tokyo olympics begin abn
First published on: 07-04-2020 at 00:07 IST