ज्या ट्वेन्टी-२० विश्वचषकाच्या पाचव्या पर्वाची सारे क्रिकेट चाहते आतुरतेने वाट पाहत होते, तो क्षण आता समोर येऊ ठेपला आहे. रविवारच्या सुट्टीच्या मुहूर्तावर विश्वचषकाच्या प्राथमिक फेऱ्यांना सुरुवात होत असून सलामीची लढत यजमान बांगलादेश आणि अफगाणिस्तान यांच्याबरोबर होणार आहे. स्पर्धेच्या मुख्य फेरीची पहिली लढत भारत आणि पाकिस्तान या पारंपरिक प्रसिस्पध्र्यामध्ये होणार असून तेव्हापासून खऱ्या अर्थाने विश्वचषकाचा ज्वर चढायला सुरुवात होईल. यंदाच्या विश्वचषकासाठी पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलिया हे प्रबळ दावेदार समजले जात असून भारतासाठी मात्र यंदाची विजेतेपदाची वाट बिकट असल्याचे म्हटले जात आहे.
सराव सामन्यात बांगलादेशकडून चांगली कामगिरी पाहायला मिळाली होती. बांगलादेशकडे चांगले फिरकीपटू असून अफगाणिस्तानपेक्षा त्यांचे पारडे थोडेसे जड दिसत आहे.
डंकन फ्लेचर बांगलादेशात दाखल

भारतीय संघाच्या परदेशातील सुमार कामगिरीसाठी टीकेचे लक्ष्य ठरलेले प्रशिक्षक डंकन फ्लेचर यांचे शनिवारी सायंकाळी बांगलादेशमध्ये आगमन झाले. भारतीय संघाच्या ढासळत्या कामगिरीविषयी चर्चा करण्यासाठी बीसीसीआयचे अध्यक्ष एन. श्रीनिवासन यांनी फ्लेचर यांना चेन्नईत बोलावले होते. या बैठकीमुळे भारतीय संघ फ्लेचर यांच्याविना बांगलादेशला रवाना झाला होता. या बैठकीत फ्लेचर यांच्या भवितव्याविषयी ठोस निर्णय किंवा त्यांना अंतिम इशारा असे काही होणे अपेक्षित होते. मात्र तूर्तास तरी फ्लेचर यांना अभय मिळाले आहे. बैठकीनंतर फ्लेचर बांगलादेशला रवाना झाले. भारताचे माजी क्रिकेटपटू सुनील गावस्कर यांनी फ्लेचर यांना हटवण्याची सूचना केली होती. मात्र फ्लेचर यांना बीसीसीआयचा पाठिंबा असून, त्यांची हकालपट्टी करण्याचा कोणताही निर्णय झालेला नाही. त्यांच्या प्रशिक्षण क्षमतेवर आम्हाला विश्वास असल्याचे बीसीसीआयचे सचिव संजय पटेल यांनी स्पष्ट केले होते. दरम्यान फ्लेचर यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय संघ फतुल्ला येथे रविवारी सराव करणार आहे.