टी २० वर्ल्डकपमध्ये अफगाणिस्तानने स्कॉटलँडचा १३० धावांनी पराभव केला. अफगाणिस्ताननं नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी घेण्याचा योग्य असल्याचं आपल्या फलंदाजीतून दाखवलं. अफगाणिस्ताननं २० षटकात ४ गडी गमवून १९० धावा केल्या. तसेच स्कॉटलँडला विजयासाठी १९१ धावांचं आव्हान दिलं होतं. मात्र स्कॉटलँडचा संघ १० षटकं आणि २ चेंडू खेळत सर्वबाद ६० धावा करू शकला.

स्कॉटलँडचा डाव

अफगाणिस्तानच्या भेदक गोलंदाजीसमोर स्कॉटलँडच्या एकाही फलंदाजाचा निभाव लागला नाही. पहिला गडी संघाच्या २८ धावा असताना बाद झाला. त्यानंतर एक एक करत फलंदाज तंबूत परतले. त्यानंतर अवघ्या ३२ धावात ९ खेळाडू बाद झाले. कोएत्झर १० करून तंबूत परतला. त्यानंतर आलेला मॅकलॉड, क्रॉस, मायकल लीक्स आणि बेरिंगटॉन मैदानात तग धरू शकले नाहीत. या चौघांना आपलं खातंही खोलता आलं नाही. मुजीब उर रहमाननं ४ षटकात २० धावा देत ५ गडी बाद केले. तर राशीद खानने २ षटकं आणि २ चेंडू टाकत ४ गडी बाद केले.

अफगाणिस्तानचा डाव

अफगाणिस्तानच्या हजरतुल्लाह झाझाई आणि मोहम्मद शहजाद जोडीने सावध सुरुवात करून दिली. पहिल्या गड्यासाठी दोघांनी अर्धशतकी खेळी केली. मोहम्मद शहजादच्या रुपाने अफगाणिस्तानला पहिला धक्का बसला. २२ धावा करून शहजाद तंबूत परतला. संघाच्या ८२ धावा असताना हजरतुल्लाह झाझाई मार्क वॅटच्या गोलंदाजीवर त्रिफळाचीत झाला. झाझाईने ३० चेंडूत ४४ धावा केल्या. या खेळीत ३ षटकार आणि ३ चौकारांचा समावेश आहे. त्यानंतर तिसऱ्या गड्यासाठी रहमानुल्लाह गुरबाज आणि नजीबुल्लाह झद्रान जोडी चांगली भागीदारी केली. त्यानंतर गुरबाज जोश डवेच्या गोलंदाजीवर बाद होत तंबूत परतला गुरबाजने ३७ चेंडूत ४६ धावा केल्या. तर झद्रानने ३४ चेंडूत ५९ धावा करत बाद झाला. शरीफच्या गोलंदाजीवर व्हिलने त्याचा झेल घेतला.

अफगाणिस्तानचा संघ
राशिद खान, रहमानुल्लाह गुरबाज, हजरतुल्लाह झाझाई, असगर अफगाण, मोहम्मद नबी (कप्तान), नजीबुल्लाह झद्रान, मुजीब उर रहमान, करीम जन्नत, गुलबदीन नैब, नवीन उल हक, मोहम्मद शहजाद

स्कॉटलँडचा संघ
केली कोएत्झर (कप्तान), रिचर्ड बेरिंग्टन, मॅथ्यू क्रॉस, जोश डेव्ही, ख्रिस ग्रीव्स, मायकेल लीस्क, कॅलम मॅक्लिओड, जॉर्ज मुन्से, सफयान शरीफ, मार्क वॅट, ब्रॅड व्हील.