टी २० वर्ल्डकपच्या सुपर १२ फेरीत श्रीलंकेनं बांगलादेशचा ५ गडी राखून पराभव केला. असं असलं तरी बांगलादेशचा अष्टपैलू खेळाडू शाकिब अल हसनने टी २० वर्ल्डकपमध्ये नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. टी २० विश्वचषकात सर्वाधिक गडी बाद करण्याचा मान त्याला मिळाला आहे. पाकिस्तानचा माजी अष्टपैलू खेळाडू शाहिद आफ्रिदीला त्याने मागे टाकलं आहे. आफ्रिदीने ३४ सामनयात ३९ गडी बाद केले होते. तर आता शाकिबने २९ सामन्यात ४१ गडी बाद केले आहेत. शाकिबने टी २० वर्ल्डकपमध्ये तीन वेळा चार गडी बाद करण्याची किमया साधली आहे.

श्रीलंकेचा लसिथ मलिंगा हा तिसऱ्या स्थानावर आहे. त्याने ३१ सामन्यात ३८ गडी बाद केले आहेत. पाकिस्तानचा सईद अजमल ३६ गडी बाद करत चौथ्या आणि अजंता मेंडिस ३५ गडी बाद करत पाचव्या स्थानावर आहे.

बांगलादेशने श्रीलंकेला ४ गडी गमवून १७२ धावांचं आव्हान दिलं होतं. हे आव्हान श्रीलंकेनं १८ षटकं ५ चेंडूत ५ गडी गमवून पूर्ण केलं. श्रीलंकेला कुसल परेराच्या रुपाने पहिला धक्का बसला. १ धाव करून परेरा तंबूत परतला. त्यानंतर पथुम निस्सांका आणि चरिथ असालंका यांनी दुसऱ्या गड्यासाठी ६९ धावांची भागीदारी केली. ही जोडी फोडण्यात शाकिब अल हसनला यश आलं. त्याच्या गोलंदाजीवर पथूम निस्सांका त्रिफळाचीत झाला. त्यानंतर लगेचच अविष्का फर्नांडो बाद होत तंबूत परतला. तो बाद होऊन तंबूत परतत नाहीत तो वनिंदू हसरंगा ६ धावा करून बाद झाला. पाचव्या गड्यासाठी चरिथ असलंका आणि भानुका राजपक्षेनं विजयी भागीदारी केली. संघाला विजयासाठी ९ धावांची आवश्यकता असताना भानुका नसुम अहमदच्या गोलंदाजीवर त्रिफळाचीत झाला. त्याने ३१ चेंडूत ५३ धावा केल्या. तर चरिथ असलंकाने ४९ चेंडूत नाबाद ८० धावा केल्या.