टी २० वर्ल्डकप स्पर्धेत हळूहळू चित्र स्पष्ट होत चाललं आहे. पाकिस्तानने सुपर १२ फेरीतील सलग तीन सामने जिंकल्याने उपांत्य फेरीतील स्थान जवळपास निश्चित झालं आहे. तर इंग्लंडने दुसऱ्या गटात सलग तीन सामने जिंकत स्थान जवळपास निश्चित केलं आहे. त्यामुळे आता उपांत्य फेरीत कोणते चार संघ असतील?, याबाबत अंदाज बांधले जात आहेत. ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटपटू शेन वॉर्ननं ट्वीट करत उपांत्य फेरीत पोहोचतील अशा चार संघांची नावं सांगितली आहेत.

ग्रुप १ मधून ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड, तर ग्रुप २ मधून भारत आणि पाकिस्तान संघ उपांत्य फेरीत पोहोचतील असं शेन वॉर्नने सांगितलं आहे. त्याच अंतिम फेरीबाबतचं भाकीतही केलं आहे. अंतिम फेरीत ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंग्लंड किंवा भारत विरुद्ध पाकिस्तान सामना होण्याची शक्यता वर्तवली आहे.

पाकिस्तान आणि इंग्लंडची या स्पर्धेतील कामगिरी चांगली राहिली आहे. तर भारताने स्पर्धेतील पहिला सामना गमवल्याने आता पुढच्या कामगिरीवर लक्ष असणार आहे. त्याचबरोबर ऑस्ट्रेलियाने ३ पैकी २ सामन्यात विजय मिळवला. मात्र धावगती कमी असल्याने दक्षिण आफ्रिका दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्यामुळे येत्या दोन तीन दिवसात उपांत्य फेरीचं चित्र स्पष्ट होईल.