टी २० वर्ल्डकपच्या सुपर १२ फेरीत दक्षिण आफ्रिकेनं बांगलादेशचा ६ गडी राखून पराभव केला आहे. बांगलादेशनं दक्षिण आफ्रिकेसमोर विजयासाठी ८५ धावांचं आव्हान ठेवलं होतं. बांगलादेशचं संघ १८ षटक आणि २ दोन चेंडू खेळत सर्वबाद झाला होतं. हे आव्हान दक्षिण आफ्रिकेने ४ गडी गमवून १३ षटकं आणि ३ चेंडूत पूर्ण केलं.दक्षिण आफ्रिकेनं बांगलादेशला नमवत उपांत्य फेरीतील शर्यत कायम ठेवली आहे. आता उपांत्य फेरीसाठी दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया या दोन संघात चुरस आहे. दक्षिण आफ्रिकेची धावगती चांगली असल्याने आता ऑस्ट्रेलियाचा चांगलाच कस लागणार आहे. दक्षिण आफ्रिकेचा शेवटचा सामना इंग्लंडसोबत आहे. तर ऑस्ट्रेलियाचे उर्वरित दोन सामने बांगलादेश आणि वेस्ट इंडिजसोबत आहेत.

दक्षिण आफ्रिकेचा डाव
बांगलादेशने विजयासाठी दिलेल्या ८५ धावांचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेची सुरुवात अडखळत झाली. पहिल्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर रीझा हेन्ड्रिक्स ४ धावा करून बाद झाला. त्यानंतर क्विंटन डिकॉक १६ धावा करू महेदी हसनच्या गोलंदाजीवर त्रिफळाचीत झाला. तर एडन मरक्रमला आपलं खातंही खोलता आलं नाही. तस्कीन अहमदच्या गोलंदाजीवर मोहम्मद नईमने त्याचा झेल घेतला. रस्सी वॅनदर दुस्सेन २२ धावा करून बाद झाला. त्यानंतर टेम्बा बवुमा आणि डेविड मिलारने विजयी भागीदारी केली.

बांगलादेशचा डाव
मोहम्मद नईम आणि लिटन दास यांनी संघाला सावध सुरुवात करून दिली. मात्र संघाच्या २२ धावा असताना मोहम्मद नईम ९ धावा करून बाद झाला. रबाडाच्या गोलंदाजीवर रीझा हेन्ड्रिक्सनं झेल घेतला. त्यानंतर दुसऱ्या चेंडूवर सौम्या सरकार पायचीत होत तंबूत परतला. त्याला आपलं खातंही खोलता आलं नाही. त्यानंतर मुशफिकूर रहिम रबाडाच्या गोलंदाजीवर बाद झाला. त्यालाही आपलं खातं खोलता आलं नाही. त्यानंतर महमुदुल्लाह मैदानावर तग धरू शकला नाही. ३ धावा करून अनरिच नोर्तजेच्या गोलंदाजीवर बाद झाला. ड्वेन प्रेटोरिअसच्या गोलंदाजीवर अफिफ होसैन बाद झाला. त्यालाही आपलं खातं खोलता आलं नाही. लिटन दास २४ धावा करून माघारी परतला. शमिम हसन ११ तर महेदी हसन २७ धावा करून बाद झाले. तर तस्कीन अहमद ३ धावांवर असताना धावचीत झाला. नसुम अहमद हिट विकेट होत शून्यावर बाद झाला. रबाडा आणि नोर्तजेने प्रत्येकी ३ गडी बाद केले. तर तबरेज शम्सीने २ आणि ड्वेन प्रेटोरिअसने एक गडी बाद केला.

बांगलादेशचा संघ- मोहम्मद नईम, लिटन दास, शमिम होसैन, सौम्या सरकार, मुशफिकर रहिम, महमुदुल्लाह, अफिफ होसैन, महेदी हसन, नसुम अहमद, शोरिफुल इस्लाम, तस्कीन अहमद

दक्षिण आफ्रिकेचा संघ- रीझा हेन्ड्रिक, क्विंटन डिकॉक, रस्सी वॅनदर दुस्सेन, टेम्बा बवुमा, एडन मारक्रम, डेविड मिलार, ड्वेन प्रेटोरिअस, कासिगो रबाडा, केशव महाराज, अनरिच नोर्तजे, तबरेज शस्मी