टी २० वर्ल्डकपच्या सुपर १२ फेरीतील पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने दक्षिण आफ्रिकेचा ५ गडी आणि २ चेंडू राखून पराभव केला. दक्षिण आफ्रिकेने ऑस्ट्रेलियाला विजयासाठी ११९ धावांचं आव्हान दिलं होतं. हे लक्ष्य ऑस्ट्रेलियाने ५ गडी गमवून १९ षटकं आणि ४ चेंडूत पूर्ण केलं.

ऑस्ट्रेलियाचा डाव

दक्षिण आफ्रिकेने विजयासाठी दिलेल्या धावांचा पाठलाग करण्यासाठी डेविड वॉर्नर आणि फिंच जोडी सलामीला आली. मात्र फिंचला आपलं खातंही खोलता आलं नाही, नोर्तजेच्या गोलंदाजीवर रबाडाने त्याचा झेल घेतला. डेविड वॉर्नरच्या रुपाने ऑस्ट्रेलियाला दुसरा धक्का बसला. रबाडाच्या गोलंदाजीवर हेन्रिच क्लासेननं त्याचा झेल घेतला. वॉर्नर १५ चेंडूत १४ धावा करून तंबूत परतला. मिशेल मार्शच्या रुपाने ऑस्ट्रेलियाला तिसरा धक्का बसला. १७ चेंडूत ११ धावा करून तंबूत परतला. त्यानंतर स्टीव्ह स्मिथ ३४ चेंडूत ३५ धावा करत केशव महाराजच्या गोलंदाजीवर बाद झाला. तर ग्लेन मॅक्सवेल १८ धावांवर असताना शम्सीने त्याचा त्रिफळा उडवला.

दक्षिण आफ्रिकेचा डाव

दक्षिण आफ्रिकेला टेम्बा बवुमाच्या रुपाने पहिला धक्का बसला. बवुमा ग्लेन मॅक्सवेलच्या गोलंदाजीवर त्रिफळाचीत झाला. त्याने ७ चेंडूत १२ धावा केल्या. या खेळीत २ चौकारांचा समावेश आहे. टेम्बा पाठोपाठ रस्सी दुस्सेनही तंबूत परतला आहे. ३ चेंडूत २ धावा करून तंबूत परतला आहे. क्विंटन डिकॉकही मैदानात जास्त काळ तग धरू शकला नाही. ७ धावांवर असताना हेझलवूडच्या गोलंदाजीवर त्याचा त्रिफळा उडाला. हेन्रिच क्लासेनच्या रुपाने दक्षिण आफ्रिकेला चौथा धक्का बसला. पॅट कमिन्सच्या गोलंदाजीवर स्टीव स्मिथने त्याचा झेल घेतला. १३ चेंडूत १३ धावा करून तंबूत परतला. डेविड मिलार आणि मारक्रम जोडीने डाव सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र मिलार संघाच्या ८० धावा असताना बाद झाला. अ‍ॅडम झाम्पाच्या गोलंदाजीवर पायचीत झाला. त्यानंतर लगेचच ड्वेन प्रेटोरियर बाद झाला. तर केशव महाराज धावचीत होत तंबूत परतला. त्याला आपलं खातही खोलता आलं नाही. अ‍ॅडन मारक्रम ३६ चेंडूत ४० धावा करून बाद झाला. स्टार्कच्या गोलंदाजीवर ग्लेन मॅक्सवेलने त्याचा झेल घेतला. नोर्तजे ३ चेंडूत २ धावा करून माघारी आला. मिचेल स्टार्कच्या गोलंदाजीवर फिंचने त्याचा झेल घेतला.

दक्षिण आफ्रिकेचा संघ- क्विंटन डीकॉक, टेम्बा बवुमा, रस्सी वॅनदर दुसेन, अ‍ॅडन मारक्रम, डेविड मिलार, हेन्रिच क्लासेन, ड्वेन प्रेटोरियस, कासिगो रबाडा, केशव महाराज, अ‍ॅनरिच नोर्तजे, तब्रेझ शामसी

ऑस्ट्रेलियाचा संघ- एरॉन फिंच, डेविड वॉर्नर, मिशेल मार्श, स्टीव स्मिथ, ग्लेन मॅक्सवेल, मार्कस स्टोइनिस, मॅथ्यू वॅड, मिचेल स्टार्क, पॅट कमिन्स, अ‍ॅडम झाम्पा, जोश हेझलवूड