शारजा : ट्वेन्टी-२० विश्वचषकाच्या ‘अव्वल-१२’ फेरीत शनिवारी श्रीलंकेविरुद्ध होणाऱ्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा प्रमुख फलंदाज क्विंटन डीकॉकच्या कामगिरीकडे सर्वाच्या नजरा असतील.
यष्टिरक्षक फलंदाज डीकॉकने वर्णद्वेषविरोधी मोहिमेला पाठिंबा न दर्शवता विंडीजविरुद्धच्या लढतीतून माघार घेतली होती. परंतु दुसऱ्याच दिवशी त्याने माफी मागून विश्वचषकात खेळणार असल्याचे सांगितले. ऑस्ट्रेलियाविरुद्ध सलामीची लढत गमावणाऱ्या आफ्रिकेने विंडीजचा सहज पराभव केला. त्यामुळे आता सलग दुसरा विजय मिळवून उपांत्य फेरीची दावेदारी भक्कम करण्याचा त्यांचा प्रयत्न असेल.
दुसरीकडे दसून शनकाच्या नेतृत्वाखालील श्रीलंकेने बांगलादेशला धूळ चारल्यावर ऑस्ट्रेलियाकडून त्यांना हार पत्करावी लागली. त्यामुळे विजयपथावर परतण्यासाठी ते उत्सुक आहेत. चरिथ असलंका, भानुका राजपक्षे यांच्यावर फलंदाजीची, तर वनिंदू हसरंगा, महीष थीक्षणा या फिरकी जोडीवर श्रीलंकेच्या गोलंदाजीची भिस्त आहे.
’ वेळ : दुपारी ३.३० वा.