शारजा : गतविजेते वेस्ट इंडिज, बांगलादेश आणि ऑस्ट्रेलिया यांच्यासारख्या मातब्बर संघांना नमवत ट्वेन्टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत विजयी घोडदौड राखणाऱ्या इंग्लंडच्या संघाने सोमवारी झगडणाऱ्या श्रीलंकेला पराभूत केल्यास त्यांचे उपांत्य फेरीमधील स्थान निश्चित होईल.

शनिवारी परंपरागत प्रतिस्पर्धी ऑस्ट्रेलियावर आठ गडी राखून विजय मिळवताना ईऑन मॉर्गनच्या नेतृत्वाखालील इंग्लंडने जणू अन्य संघांना इशाराच दिला आहे. या लढतीत इंग्लंडने आरोन फिंचचे कच्चे दुवे हेरून मोईन अलीऐवजी लेग-स्पिनर आदिल रशीदकडे प्रथम चेंडू दिला. वेगवान गोलंदाज ख्रिस वोक्सने नवा चेंडू खुबीने हाताळला, तर ख्रिस जॉर्डनने तीन बळी घेत ऑस्ट्रेलियाच्या डावाला खिंडार पाडले.

दुसरीकडे, श्रीलंकेने बांगलादेशला हरवून विश्वचषक अभियानाला उत्तम प्रारंभ केला. परंतु त्यानंतर ऑस्ट्रेलियाने त्यांना सहज हरवले, तर दक्षिण आफ्रिकेविरुद्ध अखेरच्या षटकात सामना हातातून निसटला. चरिथ असलंकाने सातत्याने धावा करीत श्रीलंकेच्या फलंदाजीची धुरा सांभाळली आहे. श्रीलंकेच्या फिरकीची जबाबदारी सांभाळणाऱ्या वनिंदू हसरंगाने स्पर्धेमधील सहा सामन्यांत ११ बळी मिळवले आहेत.

’ वेळ : सायं. ७.३० वा.

’ थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स १, १ हिंदी