टी-२० विश्वचषकात भारताने स्कॉटलंडवर दणदणीत विजय मिळवला. त्यानंतर भारत उपांत्य फेरीत जाणार की नाही याकडे सर्वच भारतीय क्रिकेट चाहत्यांचं लक्ष लागलं आहे. त्यामुळेच भारत कोणकोणत्या परिस्थितीत उपांत्या फेरीत दाखल होऊ शकतो यावर चर्चांना उधाण आलंय. आता आंतरराष्ट्रीय क्रिकेट मंडाळाने (ICC) देखील ट्वीट करत भारताच्या उपांत्य फेरीतील प्रवेशावर भाष्य केलंय.

आयसीसीने आपल्या ट्वीटमध्ये स्कॉटलंडवरील दणदणीत विजयचा उल्लेख केलाय. तसेच भारताचे उपांत्य फेरीत जाण्याची शक्यता वर्तवली आहे. तसेच एका लेखाची लिंक शेअर केली. त्यात भारत कोणत्या परिस्थितीत उपांत्या फेरीत पोहचू शकतो यावर भाष्य केलं.

न्यूझीलंड जिंकल्यास काय होईल?

अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यात न्यूझीलंड जिंकल्यास ‘मेन इन ब्लॅक’ अगदी सहजपणे उपांत्य फेरी गाठेल. त्यावेळी भारताचं नेट रन रेटही (NRR) महत्त्वाचं राहणार नाही. अशा परिस्थितीत भारत थेट विश्वचषक स्पर्धेच्या बाहेर जाईल. या विजयासह किवीचे ८ पॉईंट होतील. हा टप्पा गाठणं भारताच्या आवाक्याबाहेर राहिल. त्यामुळे न्यूझीलंडचा विजय हा भारतासाठीच सर्वात वाईट शक्यता आहे.

अफगाणिस्तान जिंकल्यास काय होईल?

न्यूझीलंड विरुद्धच्या सामन्यात अफगाणिस्तानने विजय मिळवला तर भारतासाठी आशेचा किरण कायम राहिल. मात्र, यास्थितीत उपांत्य फेरीत दाखल होण्यासाठी अफगाणिस्तानचीही दावेदारी राहील. भारताला आपली दावेदारी कायम ठेवण्यासाठी पुढील नामिबिया विरोधातील सामना मोठ्या फरकाने जिंकावा लागेल तरच नेट रन रेटच्या आधारावर भारत उपांत्या फेरी गाठू शकेल. मात्र, अफगाणिस्तानचं नेट रन रेट देखील निर्णयाक ठरेल.

हेही वाचा : Points Table: खेळ क्रिकेटचा नाही ‘जर.. तर..’चा; Ind, Nz आणि Afg चे प्रत्येकी ६ गुण झाले तर कोण होणार Qualify?

भारताला नेमकं काय करावं लागेल?

आता भारताच्या सर्व आशा अफगाणिस्तानवर आहेत. सध्या ग्रुप २ मध्ये भारतीय संघाचं नेट रन रेट सर्वोत्त आहे. मात्र, न्यूझीलंड जिंकल्यास याचा भारताला उपांत्य फेरीत पोहचण्यासाठी फारसा उपयोग होणार नाही. त्यामुळे अफगाणिस्तानचा विजय हाच भारतासाठी शेवटचा आशेचा किरण आहे.