Points Table: खेळ क्रिकेटचा नाही ‘जर.. तर..’चा; Ind, Nz आणि Afg चे प्रत्येकी ६ गुण झाले तर कोण होणार Qualify?

अशी दाट शक्यता व्यक्त केली जात आहे की भारत, न्यूझीलंड आणि अफगाणिस्तानचे प्रत्येकी सहा गुण होतील, पण असं झालं तर पुढे कोण जाणार?

t20 world cup 2021 points table group 2
दुसऱ्या गटामधील चुरस वाढली

भारतीय संघाने बुधवारी टी-२० विश्वचषकात अफगाणिस्तानचा ६६ धावांनी धुव्वा उडवला. ‘अव्वल-१२’ फेरीच्या या सामन्यात भारताने दिलेल्या २११ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना अफगाणिस्तानला २० षटकांत ७ बाद १४४ धावाच करता आल्या. भारताने या विजयासह उपांत्य फेरी गाठण्याच्या आशा कायम राखल्या आहेत. मात्र असं असलं तरी या सामन्यानंतर ग्रुप टूमधील चुरस आणखीन वाढली आहे.

पाकिस्तानने उपांत्य फेरी गाठली आहे. मात्र उपांत्य फेरीमध्ये जाणारा दुसरा संघ कोण यासाठी तीन संघांची दावेदारी कायम आहे. पण यामध्येही भारताला जर तरच्या आधारावर उपांत्य फेरी गाठता येणार आहे. म्हणजे सामन्याचे काही ठराविक निकाल लागले तर ग्रुप स्टेजमधील सर्व सामने संपल्यानंतर भारत, न्यूझीलंड, अफगाणिस्तानचे प्रत्येकी सहा गुण होण्याची शक्यता आहे. बरं हे असं कसं होऊ शकतं आणि नक्की काय शक्यता आहेत हे समजून घेण्याआधी आपण सध्या म्हणजेच भारत अफगाणिस्तान सामन्यानंतर ग्रुपची परिस्थिती काय आहे ते पाहूयात…

पाकिस्तान –
पाकिस्तानचा संघ चार सामने खेळला असून त्यांनी चारही सामने जिंकले आहेत. उपांत्य फेरीत जाणारे ते या ग्रुप टूमधील पहिला संघ ठरले आहेत. त्याचा नेट रनरेट +१.०६५ इतका आहे. त्यांचा उर्वरित सामना स्कॉटलंडविरोधात असल्याने ते अजिंक्य राहूनच पुढील फेरीत जातील असं म्हटलं जात आहे.

अफगाणिस्तान –
अफगाणिस्तानच्या संघाने चार सामने खेळले असून त्यांनी दोन सामने जिंकलेत दोन गमावले आहेत. त्यामुळेच त्यांचे एकूण चार गुण असून नेट रनरेट +१.४८१ इतका आहे. त्यांचे उर्वरित सामने हे न्यूझीलंड आणि स्कॉटलंडविरुद्धचा सामना बाकी आहे. यापैकी त्यांनी न्यूझीलंडच्या सामन्यात विजय मिळवल्यास भारताला फायदा होईल. कारण असं झाल्यास अफगाणिस्तानचेही सहा गुण होती आणि उरलेला एक सामना जिंकून न्यूझीलंडही सहा गुणांपर्यंतच मजल मारु शकेल.

न्यूझीलंड –
न्यूझीलंडने आतापर्यंत तीन सामने खेळले असून तीन पैकी त्यांनी दोन सामन्यांमध्ये विजय मिळवलाय. भारत आणि स्कॉलंडला त्यांनी पराभूत केलं आहे तर पाकिस्तानकडून त्यांचा पराभव झालाय. त्यांचा नेट रनरेट हा +०.८१६ इतका आहे. त्यामुळे तिसऱ्या स्थानी आहेत. अफगाणिस्तानविरुद्धचा सामना जिंकल्यास त्यांचं उपांत्य फेरीचं तिकीट निश्चित होणार आहे. कारण त्यांचा उर्वरित एक सामना दुबळ्या नामिबियासोबत असणार आहे.

भारत-
भारताचे दोन सामने बाकी आहे. आतापर्यंतच्या तीन सामन्यांमध्ये अफगाणिस्तानविरुद्धचा सामना वगळता भारताला दोन वेळा पराभवाचं तोंड पहावं लागलं आहे. भारताचा नेट रनरेट हा +०.०७३ आहे. पण आता उरलेल्या दोन सामन्यांमध्ये नामिबिया आणि स्कॉटलंडला मोठ्या फरकाने पराभूत करुन उपांत्य फेरीत प्रवेश करण्याचं भारतासमोर आव्हान आहे. मात्र त्याचबरोबर भारताला अफगाणिस्तानच्या कामगिरीवर अवलंबून रहावं लागणार आहे.

नामिबिया आणि स्कॉटलंड –
हे दोन्ही देश अगदीच नवखे असले तरी त्यांनी चांगली कामगिरी केली आहे. मात्र एक सामना वगळता जिंकण्यात त्यांना यश आल्याचं दिसत आहे. स्कॉटलंडला एकही सामना जिंकता आला नाहीय, मात्र नामिबियाने एका सामन्यात विजय मिळवला आहे. हे दोन्ही संघ उपांत्य फेरीच्या शर्यतीतून बाहेर आहेत.

आता भारत, न्यूझीलंड आणि अफगाणिस्तान या प्रत्येक संघाचे सहा गुण कसे होतील ते पाहूयात…

अफगाणिस्तान –
उपांत्य फेरीतील दावेदारी कायम ठेवण्यासाठी अफगाणिस्तानला ग्रुप स्टेजमध्ये त्यांचा उरलेला एकमेव सामना म्हणजेच न्यूझीलंडविरोधातील सामना जिंकावा लागणार आहे. त्यामुळे त्यांचे एकूण विजय तीन आणि पराजय दोन असं होऊन त्यांच्या खात्यावर सहा गुण जमा होतील.

न्यूझीलंड-
केन विल्यमसनच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या या संघाला त्यांचे उरलेले दोन्ही सामने जिंकावे लागणार आहे. यापैकी एक सामना नामिबियाविरोधात आहे तर दुसरा अफगाणिस्तानविरोधात. सध्या दोन पराभव खात्यावर असणाऱ्या न्यूझीलंडने हे दोन सामने जिंकल्यास एकूण विजयाची संख्या पाचवर जाईल. पण ते अफगाणिस्तानकडून पराभूत झाले आणि नामिबियाविरोधात जिंकले तर त्यांचे गुण सहाच असतील.

भारत-
भारतीय संघ या स्पर्धेआधी खेळवण्यात आलेल्या सराव सामन्यांमध्ये चांगला खेळला होता. मात्र त्यानंतर मुख्य सामन्यांमध्ये आधी भारताला पाकिस्तानने पराभूत केलं आणि नंतर न्यूझीलंडकडूनही भारताचा मानहानीकारक पराभव झाला. अफगाणिस्तानविरुद्धचा सामना ६६ धावांनी जिंकल्याने भारताचे नेट रन रेट साकारात्मक झाले आहे. आता भारतीय संघ पाच नोव्हेंबर रोजी स्कॉटलंडविरोधात तर आठ नोव्हेंबर रोजी नामिबियाविरोधात खेळणार आहे. हे दोन्ही सामने जिंकल्यास भारताच्या खात्यावर एकूण तीन विजयांसहीत ६ गुण जमा होती.

तिन्ही संघांचे सहा गुण असल्यावर काय?
भारत, न्यूझीलंड आणि अफगाणिस्तान या प्रत्येक संघाचे सहा गुण असले तर नेट रनरेटच्या जोरावर दुसरा संघ पुढील फेरीत जाईल. म्हणजेच भारताला आता स्कॉटलंड आणि नामिबियाविरुद्धचे सामने मोठ्या फरकाने जिंकण्याबरोबरच न्यूझीलंड अफगाणिस्तान सामना अटीतटीचा होऊन अफगाणिस्तानचा विजय व्हावा यासाठी देव पाण्यात ठेवावे लागणार आहेत.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: T20 world cup 2021 points table group 2 what if india new zealand afghanistan all have 6 points each scsg

Next Story
VIDEO: …म्हणून आपण न्यूझीलंडविरुद्ध हरलो
ताज्या बातम्या