भारत-पाकिस्तान क्रिकेट सामना चाहत्यांसाठी नेहमीच एक पर्वणी असते. हे दोन संघ फक्त आयसीसीच्या स्पर्धांमध्ये एकत्र येतात. हा सामना घोषित होताच अनेकजण या सामन्यासाठी आतूर असतात. सामन्यापूर्वी दोन्ही देशांकडून मत-मतांतरे नोंदवली जातात. यावेळी पाकिस्तानचा कप्तान बाबर आझमने सामन्यापूर्वी बिनधास्त प्रतिक्रिया दिली आहे. महत्त्वाची गोष्ट अशी, की वर्ल्डकप स्पर्धेत पाकिस्तान भारताला कधीही पराभूत करू शकलेला नाही.

बाबर म्हणाला, “संघ म्हणून तुमचा विश्वास आणि आत्मविश्वास एखाद्या स्पर्धेपूर्वी खूप महत्त्वाचा असतो. एक संघ म्हणून आमचेही तसेच आहे. आम्ही भूतकाळाचा नाही, तर भविष्याचा विचार करत आहोत. आम्ही त्यासाठी तयारी करत आहोत. मला पूर्ण विश्वास आहे की आम्ही चांगली तयारी केली आहे आणि त्या दिवशी चांगले क्रिकेट खेळू.”

हेही वाचा – जसप्रीत बुमराहशी तुलना होणारा शाहीन आफ्रिदी आहे तरी कोण?

“आम्ही गेल्या ३-४ वर्षांपासून यूएईमध्ये क्रिकेट खेळत आहोत आणि आम्हाला परिस्थिती चांगली माहीत आहे. विकेट कशी असेल आणि फलंदाजांना कशी कामगिरी करावी लागेल, हे आम्हाला माहीत आहे. त्या दिवशी जो चांगले क्रिकेट खेळेल तो जिंकेल. जर तुम्ही मला विचारले, तर आम्ही जिंकू”, असेही २७ वर्षीय बाबरने सांगितले.

२०१९ च्या विश्वचषकात मँचेस्टर येथे पाकिस्तान आणि भारत एकमेकांसमोर आले होते, जेथे भारताने ८९ धावांनी विजय मिळवला. यंदाच्या टी-२० वर्ल्डरकपमध्ये २४ ऑक्टोबरला हे दोन्ही संघ आमनेसामने असतील. या दोघांव्यतिरिक्त न्यूझीलंड, अफगाणिस्तान आणि क्वालिफायरमधील इतर दोन संघांना गटात स्थान देण्यात आले आहे.