जागतिक सांघिक टेबल टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत भारतीय पुरुषांचे आव्हान संपुष्टात आले. दोन वर्षांपूर्वी झालेल्या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत भारतीय पुरुष संघाला २७व्या स्थानावर समाधान मानावे लागले होते. या स्पर्धेतही  पराभवाला सामोरे जावे लागल्याने भारतीय संघाला २६ ते ३२ या टप्प्यातच समाधान मानावे लागणार आहे.
इजिप्तच्या संघाने भारतीय संघाचा ३-० असा धुव्वा उडवला. ओमर असारने शरथ कमालवर ११-८, ५-११, ७-११, ११-४, ११-६ असा विजय मिळवला. इल सय्यद लशीनने सौम्यजित घोषवर ११-९, ९-११, १३-११, ११-५ अशी मात केली. तिसऱ्या आणि शेवटच्या लढतीत सालेह अहमदने हरमीत देसाईला ११-५, ११-५, ७-११, ११-७ असे नमवले. महिला संघाने इजिप्तला नमवत उपांत्यपूर्व फेरीत आगेकूच केली आहे.