भारतीय संघ ३ ऑगस्टपासून विंडीज दौऱ्यावर जात आहे. या दौऱ्यात संघ ३ टी २०, ३ एकदिवसीय आणि २ कसोटी सामने खेळणार आहे. यातील कसोटी सामने हे टेस्ट चॅम्पियनशिप अंतर्गत असणार आहे. या दौऱ्यासाठी एमएसके प्रसाद यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय निवड समिती शुक्रवारी भारताची संघनिवड करणार होती. या वेळी अनुभवी यष्टिरक्षक-फलंदाज महेंद्रसिंह धोनीचे भवितव्य आणि कर्णधार विराट कोहलीच्या उपलब्धतेकडे साऱ्यांचे लक्ष असणार होते, मात्र आता भारताची ही संघ निवड लांबणीवर पडली आहे.

राष्ट्रीय निवड समितीच्या बैठकीचे समन्वयक पद हे भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (BCCI) सरचिटणीस अमिताभ चौधरी यांच्याकडे होते. पण BCCI यात बदल करत हे समन्वयकपद निवड समिती अध्यक्ष एमएसके प्रसाद यांच्याकडे दिले आहे. निवड समितीचे अध्यक्ष हे राष्ट्रीय निवड समितीच्या बैठकीचे समन्वयक असतील असे निर्देश प्रशासकीय समितीने दिले आहेत. त्यामुळे विंडीज दौऱ्यासाठी होणारी संघ निवड पुढे ढकलण्यात आली आहे. एमएसके प्रसाद यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय निवड समितीची बैठक आता रविवारी होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. सुरुवातीला ही बैठक शुक्रवारी होणार होती. त्यानंतर ही बैठक रविवारी होणार असे सांगण्यात आले आहे.

‘‘नियम बदलल्यामुळे काही कायदेशीर बाबींची पूर्तता करण्यासाठी थोडा अवधी लागणार आहे. BCCI चे क्रिकेट प्रशासन विभाग निवड समिती अध्यक्षांशी याबाबत संपर्कात आहे. याचप्रमाणे खेळाडूंच्या तंदुरुस्तीचा अहवाल शनिवारी सायंकाळी उपलब्ध होणार आहे. त्यामुळे ही बैठक लांबणीवर पडली आहे,’’ असे BCCI च्या सूत्रांनी सांगितले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

देशांतर्गत होणाऱ्या बैठकीत निवड समितीचे अध्यक्ष समन्वयक असतील, तर परदेश दौऱ्यावर प्रशासकीय व्यवस्थापक समन्वयकाची भूमिका पार पाडेल, असे निर्देश देण्यात आले आहेत. त्यामुळे आता निवड समितीच्या बैठकीला सचिवांना उपस्थित राहता येणार नाही.