बांगलादेशमध्ये पुढील महिन्यात होणारी आयसीसी ट्वेन्टी-२० विश्वचषक स्पर्धा आणि आशिया चषक क्रिकेट स्पध्रेसाठी भारतीय संघाची निवड इराणी चषक सामन्यादरम्यान बंगळुरूमध्ये होणार आहे.
‘‘रणजी विजेता कर्नाटक आणि शेष भारत यांच्यात ९ ते १३ फेब्रुवारी या कालावधीत बंगळुरू येथे इराणी चषकाचा सामना होणार आहे. या सामन्याला पाचही निवड समिती सदस्य हजेरी लावणार आहेत. या सामन्यादरम्यान भारतीय संघाची घोषणा करण्यात येईल. ट्वेन्टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पध्रेसाठी १५ फेब्रुवारीपर्यंत संघ जाहीर करता येईल,’’ अशी माहिती भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) सूत्रांनी दिली. बीसीसीआयने आपल्या संभाव्य चमूची घोषणा दिलेल्या मुदतीत केली होती.
२००७-०८मध्ये भारताने पहिल्यावहिल्या ट्वेन्टी-२० विश्वचषकाला गवसणी घातली होती. मिरपूरच्या शेर-ए-बांगला राष्ट्रीय स्टेडियमवर २१ मार्चला दुसऱ्या गटामधील भारताची गाठ परंपरागत प्रतिस्पर्धी आणि २००९च्या विजेत्या भारताशी पडणार आहे. त्यानंतर भारत २३ मार्चला वेस्ट इंडिजशी, २८ मार्चला पहिल्या टप्प्यातील पात्र संघाशी आणि ३० मार्चला ऑस्ट्रेलियाशी भिडणार आहे. ३ आणि ४ एप्रिलला दोन उपांत्य लढती होणार आहेत, तर ६ एप्रिलला अंतिम सामना होणार आहे. तथापि, पाच संघांचा समावेश असलेली मर्यादित षटकांची आशिया चषक एकदिवसीय क्रिकेट स्पर्धा २५ फेब्रुवारी ते ८ मार्च या कालावधीत होणार असून, फतुल्लाह आणि मिरपूर येथे हे सामने होणार आहेत.