जयपूर पिंक पँथर्सची दबंग दिल्लीवर मात; पंच दामोदर यांच्याविरोधातील तक्रार फेटाळली

जयपूर पिंक पँथर्सने प्रो कबड्डी लीग स्पर्धेच्या एकतर्फी लढतीत दबंग दिल्लीचा ५१-२६ असा धुव्वा उडवला आणि गुणतालिकेत अव्वल स्थानी झेप घेतली.  अन्य लढतीत घरच्या मैदानावर खेळणाऱ्या तेलुगू टायटन्सने खणखणीत सांघिक प्रदर्शनाच्या बळावर यू मुंबावर ३५-३० अशी मात केली.

घरच्या मैदानावर विजयासाठी आतूर तेलुगू टायटन्स संघाने यू मुंबाविरुद्ध सावध सुरुवात केली आणि मध्यंतरापर्यंत १२-९ अशी निसटती आघाडी राखली. विश्रांतीनंतर टायटन्स संघाने आक्रमण आणि बचाव दोन्ही आघाडय़ांवर आक्रमक पवित्रा घेत बाजी मारली. टायटन्स संघातर्फे नीलेश साळुंखेने ८ तर हुकमी एक्का असणाऱ्या कर्णधार राहुल चौधरीने चढायांमध्ये ७ गुणांची कमाई केली. पकडींमध्ये संदीप ढुलने ४ तर संदीप नरवालने ३ गुण पटकावत संघाच्या विजयात निर्णायक भूमिका बजावली.

जसवीर सिंग, राजेश नरवाल आणि अजय कुमार या भन्नाट त्रिकुटाच्या बळावर जयपूर पिंक पँथर्सने मध्यंतराला २६-११ अशी भक्कम आघाडी घेतली. यादरम्यान त्यांनी दबंग दिल्लीवर दोनदा लोण चढवला. नावात ‘दबंग’ असूनही दिल्लीच्या संघाने अत्यंत सुमार खेळाचे प्रदर्शन केले. विश्रांतीनंतर जयपूरचा झंझावात आणखी तीव्र झाला. जयपूरने दिल्लीवर आणखी दोन लोण चढवले. राजेश नरवाल (११) तर जसवीर सिंग (७) यांनी दमदार चढायांच्या बळावर जयपूरच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. अमित हुडाने पाच यशस्वी पकडी करत चांगली साथ दिली.

दरम्यान, मंगळवारी झालेल्या वादग्रस्त सामन्यानंतर तेलुगू टायटन्स संघाने पंच दामोदर यांच्याविरोधात अधिकृत तक्रार दाखल करण्याचा प्रयत्न केला. मात्र तांत्रिक समितीने तक्रार दाखल करून घेण्यास नकार दिला. प्रतिस्पध्र्याचा खेळाडू परतण्याआधीच राहुल चौधरीने उतावीळपणे चढाई केली. त्याने नियम पाळला असता तर टायटन्सला नियमानुसार चढाई करता आली असती असे कारण देत समितीने तक्रार दाखल करून घेतली नाही.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आजचे सामने

  • पाटणा पायरेट्स वि. बंगळुरू बुल्स
  • वेळ : रात्री ८ वाजल्यापासून
  • थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स वाहिन्यांवर