‘वादविरहित स्पर्धा’ असे बिरूद मिरवणाऱ्या प्रो कबड्डी लीग स्पर्धेतील तेलुगू टायटन्स आणि बंगळुरू बुल्स हा दाक्षिणात्य मुकाबला वादाच्या भोवऱ्यात सापडला. सामना संपण्यासाठी निर्धारित वेळेची मर्यादा बाकी असतानाही पंच दामोदर यांनी आमची चढाई रोखली आणि म्हणूनच पराभवाला सामोरे जावे लागले, अशी थेट टीका हैदराबाद संघाने केली. टायटन्स संघाने मैदानावरच नाराजी व्यक्त केली, मात्र पंचांनी आपला निर्णय कायम ठेवला आणि बंगळुरूने ही लढत ३०-२८ अशी जिंकली.
पंच दामोदर यांच्यामुळेच आतापर्यंत तीन सामने गमावले आहेत, अशी टीका टायटन्सच्या प्रशिक्षकांनी केली. दामोदर यांच्याविरोधात अधिकृत तक्रार दाखल करणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केली. दरम्यान, वादाने शेवट झालेल्या या लढतीची सुरुवातही वादग्रस्त झाली होती. हैदराबाद संघाने बंगळुरूच्या रोहित कुमारने मलम लावल्याची तक्रार केली. पंचांनी रोहितच्या पायाची तपासणी केली. मात्र काहीही आक्षेपार्ह न आढळल्याने त्यांनी रोहितला खेळण्याची अनुमती दिली. एकूणच विशिष्ट पंचांमुळे पराभव होत असल्याच्या टीकेमुळे मोठय़ा वादाला तोंड फुटले आहे.
‘‘सलग तिसऱ्या सामन्यात पंच दामोदर यांनी आमच्याविरोधात निर्णय दिला आहे. अखेरच्या सेकंदांमध्ये चढाई करुन आम्ही बरोबरी करु शकलो असतो. पण दामोदर यांनी संधी नाकारली. संघ चांगली कामगिरी करतो आहे. पण एका पंचाच्या निर्णयामुळे आमचा विजय हिरावून घेतला आहे,’’ असे टायटन्सचे प्रशिक्षक उदय कुमार यांनी सांगितले. त्यांच्याविरोधात अधिकृत तक्रार दाखल करणार आहोत असेही त्यांनी स्पष्ट केले.
टायटन्स संघाच्या आरोपात जराही तथ्य नाही. पंचांनी नियमानुसार निर्णय दिला. सामन्याची स्थिती निर्णायक होती. विजयाचे पारडे कोणत्याही दिशेला झुकू शकत होते. टायटन्सने पंचांच्या निर्णयाला आव्हान दिले तरी हरकत नाही. त्यांच्याविरुद्धच्या लढतीत विजय मिळवून दाखवू असे बंगळुरूचे प्रशिक्षक रणधीर सिंग शेरावत यांनी स्पष्ट केले.
या सामन्यात दोन्ही संघांनी सावध सुरुवात केली. मध्यंतराला बंगळुरूकडे १६-११ अशी आघाडी होती. उत्तरार्धात राहुल चौधरीने सलग दोन चढायांत संघाला दोन गुण मिळवून दिले आणि गुणसंख्या २२-३० झाली. बंगळुरूचा आधारस्तंभ असलेल्या रोहित कुमारची चढाई करत टायटन्सने एक गुण मिळवला. राहुल चौधरीच्या चढाईसह टायटन्स संघाने बंगळुरूवर लोण चढवला आणि २६-३० अशी पिछाडी भरून काढली. नीलेशने गुण पटकावला आणि टायटन्सने २७-३० अशी आगेकूच केली. शेवटच्या मिनिटांमध्ये टायटन्सची २८-३० अशी स्थिती असताना बंगळुरूच्या पवन कुमारची पकड झाली आणि उरलेली पिछाडी भरुन काढण्यासाठी टायटन्सचा कर्णधार राहुल चौधरीने उतावीळपणे चढाईला सुरुवात केली. मात्र बाद झालेला बंगळुरूचा पवन कुमार बाहेर जाण्याआधी निर्धारित वेळ संपली. मात्र तरीही राहुल चौधरीने चढाई करण्याचा प्रयत्न केला. हा प्रयत्न पंच आणि बंगळुरूच्या खेळाडूंनी रोखला.
महिलांमध्ये फायर बर्ड्स आणि स्ट्रॉम क्वीन्स यांच्यातील सामना १४-१४ अशा बरोबरीत सुटला. फायर बर्ड्सची कर्णधार ममता पुजारीने सर्वाधिक सहा गुण कमावले, तर स्ट्रॉम क्वीन्सकडून मोती चंदनने चार गुण मिळवले.