कोस्टा रिका संघाने बाद फेरीत ग्रीस संघाचा पेनल्टी शूटआऊटमध्ये ५-३ असा पराभव करुन स्पर्धेची उपांत्यपूर्व फेरी गाठली आहे.
सामना निर्धारित वेळेत आणि त्यानंतरच्या अतिरिक्त वेळेनंतरही १-१ असा बरोबरीत सुटला होता. त्यामुळे पेनल्टी शूटआऊटपर्यंत सामना लांबला गेला. यामध्ये कोस्टा रिकाचा गोलरक्षक नवासने उत्तम बचाव केला, तर दुसऱया बाजूला ग्रीसच्या गोलरक्षक बचावात सपशेल फोल ठरला. कोस्टा रिकाने एकही संधी न गमावता पेनल्टी शूटआऊटमध्ये पाच गोल नोंदविले, तर ग्रीसला केवळ तीन गोल नोंदविता आले. कोस्टा रिकाचा गोलरक्षक नवास विजयाचा शिल्पकार ठरला.
सामन्यात ब्रायन रुईजने ५२ व्या मिनिटाला गोल करत कोस्टा रिकाला आघाडी मिळवून दिली होती. त्यानंतर ९१ व्या मिनिटाला ग्रीसच्या पापास्थाथॉपुलोसने शानदार गोल करत बरोबरी साधून दिली होती. अखेर सामना बरोबरीत सुटल्याने पेनल्टी शुटआऊट घेण्यात आले आणि यामध्ये कोस्टा रिकाने बाजी मारली.
कोस्टा रिकाकडून ब्रायन रुईज, बोर्जेस, गोन्झालेझ आणि कॅम्पबेलने पहिले चार गोले केले. त्यानंतर मायकल उमान्याने पाचवा गोल नोंदवत कोस्टा रिकाच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.