न्यूझीलंडविरुद्ध येत्या १६ ऑक्टोबरपासून सुरू होणाऱया एकदिवसीय मालिकेसाठीच्या १५ सदस्यीय संघाची घोषणा गुरूवारी करण्यात आली. एकदिवसीय मालिकेतून फिरकीपटू आर.अश्विन आणि रवींद जडेजा यांना विश्रांती देण्यात आली आहे. याशिवाय, मोहम्मद शमी याचाही एकदिवसीय संघात समावेश करण्यात आलेला नाही.

संघात केदार जाधव, जयंत यादव आणि मनदीप सिंग या नव्या चेहऱयांना संधी देण्यात आली आहे. तसेच अक्षर पटेल, हार्दिक पटेल, अमित मिश्रा, बुमराह देखील एकदिवसीय संघात खेळताना दिसतील. विशेष म्हणजे, सुरेश रैनाचे देखील एकदिवसीय संघात पुनरागमन झाले आहे. युवराज सिंगची निवड होण्याची शक्यता देखील फोल ठरली आहे. युवराजचा भारतीय एकदिवसीय संघात समावेश करण्यात आलेला नाही. संघाचे नेतृत्त्व महेंद्रसिंग धोनी करणार असून, विराट कोहली संघाच्या उपकर्णधाराची भूमिका पार पाडणार आहे.

‘बीसीसीआय’च्या निवड समितीची बैठक आज घेण्यात आली. न्यूझीलंडविरुद्ध एकूण पाच एकदिवसीय सामने खेळविले जाणार आहे. यातील पहिल्या तीन सामन्यांसाठी आज संघ निवड करण्यात आली आहे.

भारतीय संघ-
महेंद्रसिंग धोनी (कर्णधार), विराट कोहली, रोहित शर्मा, अजिंक्य रहाणे, मनिष पांडे, सुरेश रैना, हार्दिक पटेल, अक्षर पटेल, जयंत यादव, अमित मिश्रा, जसप्रित बुमराह, धवल कुलकर्णी, उमेश यादव, मनदीप सिंग, केदार जाधव.