सचिन तेंडुलकरची द्विशतकी कसोटी दोन आठवडय़ांवर आली आणि क्रिकेट जगतात आडाखे बांधले जाऊ लागले आहेत धावराशींचे अन् धनराशींचे!
अडीच वर्षांपूर्वी सचिन विश्वचषक-२०११ वर एकचित्त होता. एरवी शांत व संयमी असणाऱ्या सचिनचा पारा नागपूरमधील दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात कधी नव्हे तो चढला होता. भारताला साडेतीनशेच्या पलीकडे नेणारी झंझावाती पायाभरणी त्यानं उत्तम करून दिली होती; पण सचिन बाद झाल्यावर डाव तीनशेच्या आत गडगडला. घामाघून झालेला सचिन, पॅव्हेलियनमध्ये शॉवर-बाथ घेण्यास वळला तर तिथेही बाद फलंदाजांची गर्दी! ‘‘तुम्ही काय मोठा घाम गाळला आहे की तुम्हाला शॉवरची गरज भासावी?’’ असे शब्द त्याच्या तोंडून निघून गेले, असं सांगतात..
आजही सचिन तस्साच क्रिकेटवर एकचित्त आहे. जगमोहन दालमिया ऊर्फ डॉलरमिया यांनी कोलकातातील कसोटीच्या आदल्या सायंकाळी (म्हणजे रात्री) खास मेजवानी आयोजिली, पण गौरवमूर्ती सचिननं त्याचं आमंत्रण साभार नाकारलं. तिथं जायचं म्हणजे भाटगिरी, तोंडपुजेपणा यांना आमंत्रण द्यायचं! व्रतस्थ सचिनला ते नकोय. एका महामॅरेथॉन कारकिर्दीतील शेवटच्या दोन कसोटींवर त्याला एकचित्त राहायचंय!
धावराशी अन् धनराशी
व्रतस्थ, ध्यानस्थ विचार करतोय धावराशींचा आणि आणखी दोन भारतीय विजयांच्या पायाभरणीचा, पण तो धावराशींचा विचार करीत असताना, सट्टेबाज अन् क्रिकेटचे काही चालक-मालक हिशेब करीत आहेत धनराशींचा! विश्वचषक-२०११ मधील अंतिम सामन्यातील तिकीट विक्री काय दर्शविते? त्या सामन्यासाठी वानखेडे स्टेडियमची २५,३२४ (पंचवीस हजार तीनशे चोवीस) तिकिटे विकली गेली, पण त्यांसह त्यांच्या सुमारे २५ टक्के म्हणजे ६१८२ कॉम्प्लीमेन्टरीज (पास) वाटले गेले. त्यापैकी किमान अडीच हजार पास, ज्या कोणाकोणाच्या नावाने वाटले गेल्याचा दावा केला जातो, त्याची पावती आढळत नाही! अडीच हजार पासचा घोटाळा, हा सारा मामला धनराशींच्या हिशेबांचा!
क्रिकेट क्रीडांगणात खेळलं जातं, हे भाबडे समज. क्रिकेटचा बाजार मांडला जातो. सुपरस्टार्स ही असते या बाजाराची प्रमुख गरज. त्यांच्या कर्तबगारीचं भांडवल करणं ज्यांना फलदायी वाटतं अशा टोळ्या या बाजारात धुमाकूळ घालीत असतात.
वानखेडे स्टेडियममधील सचिनच्या दोनशेव्या कसोटीची स्वप्ने रंगविताना बघूया विश्वचषक-२०११ मधील अंतिम लढतीसाठी वानखेडेमधील या ६,१८२ पासचा तपशील. चौकशी समितीस १४ ऑगस्ट २०१३ रोजी दिलेला तपशील :
स्टेडियमची दाखविलेली क्षमता ३२,०१४. त्यासाठी छापलेली तिकिटं आठ ऑर्डर्समार्फत ३४,११९. प्रत्यक्षात विकलेली तिकिटं २५,३२४ आणि कॉम्प्लीमेन्टरीज् (पास) ६१८२ आणि पासवाटपाबाबत चौकशी समितीस मिळालेली स्फोटक माहिती अशी –
पास वाटले  : खरंच???
(१) आयसीसीला (आंतरराष्ट्रीय क्रिकेट समिती) दिलेल्या स्टॅण्डची १२७० व प्रतिष्ठित ग्रॅण्ड स्टॅण्डची ३५० असे १६२० पास दिले गेल्याचे निवेदन सांगते. पण मुंबई संघटनेचे संयुक्त सचिव लालचंद राजपूत यांनी यजमान स्पर्धा संचालक सुरू नायक यांना ३ मार्च २०११ ला लिहिलेल्या पत्रानुसार, ग्रॅण्ड स्टॅण्डचे साडेतीनशे नव्हे तर अडीचशेच पास दिले होते.
(२) मुंबई संघटनेच्या कार्यकारिणीस दिलेल्या ५८१ पासपैकी २३५ पासची पोच नाही. एमसीए कर्मचारीवर्गाला दिलेल्या १८२ पासांची पोच नाही, पण जादा दिलेल्या २० पासची पोच आढळते! माजी कार्यकारिणी सदस्यांना दिलेले ३० पास, उपसमिती सदस्यांना दिलेले ७०९ पास यांचीही पोच नाही.
(३) बीसीआय पंच ५५ व एमसीए पंच ९० यांचीही पोच नाही.
(४) कसोटीपटू व रणजीपटू यांच्या नावाने असलेले ३०० पास मिळाल्याची पोच एका व्यक्तीच्या स्वाक्षरीची! संबंधित खेळाडूंपैकी एकाचीही पोच नाही!
(५) महिला क्रिकेटपटूंच्या नावाखाली ३८ पास, राम जाणे कुणी कुणाला दिले! महिला कसोटीपटूंच्या नावावर १५ पासची व्यक्तिश: पोच नसली तरी कोणी एक श्री. बलवास यांच्या नावापुढे या पासची नोंद.
(६) एमसीएचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हवाले सुमारे ५०० (४९८) तिकिटे दिलेली, ती त्यांना मिळाली असल्याचे समितीने गृहीत धरले आहे.
(७) महाराष्ट्र सरकार, पोलीस व शासकीय संस्था यांच्याकडून पास पोहोचल्याची पावती, पण त्यावर संबंधित अधिकाऱ्याचा शिक्का नाही.
(८) एकंदर ६१८२ पैकी २५०४ पासचा ताळमेळ नाही. मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या दफ्तराकडे याचे कोणतेही स्पष्टीकरण नाही. सीईओ नाईक यांच्याकडील सुमारे ३५० पासचाही ताळमेळ नाही! तरीही याची चौकशी संघटनेस नकोशी!     क्रमश:
विश्वचषक कॉम्प्लीमेन्टरीज् पास
    आयसीसी –     १६२०
    बीसीसीआय –     १२०
    माजी कसोटीवीर –     ३००
    महिला कसोटीपटू –     १५
    महिला क्रिकेटपटू –     ३८
    खेळाडू व्हीव्हीआयपी –     ३६१
    बीसीसीआय पंच –     ५५
    एमसीए पंच –     ९०
    एमसीए कार्यकारिणी –     ५८१
    माजी कार्यकारिणी –     ३०
    अध्यक्ष –     ९३
    संयुक्त सचिव –     १३
    उपसमिती सचिव –     १०
    उपसमिती सदस्य –     ७१०
    संलग्न कुलसचिव –     ६६८
    एमसीए कर्मचारी –     १८२
    गरवारे कर्मचारी –     १३६
    गरवारे कार्यकारिणी –     ३४
    मदतनीस –     ९८
    झेंडाधारक मुले –     ६०
    वेल्फेअर सोसायटी –     १५
    सेन्ट्रल कॅटर्स –     ६
    कॅन्टिन कामगार –     १२
    बीएचए –     १५
    सीसीआय –     १०
    प्राप्तीकर –     १३
    पोलीस –     ८६
    अध्यक्ष ओएसडी –     २५०
    इतर सारे –     ३०१
    महाराष्ट्र सरकार –     २५०
    एकूण –     ६१८२

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Thought of runs and calculations of money no account of world cup complimentary tickets
First published on: 04-11-2013 at 01:26 IST