WI vs AUS 3rd T20, Tim David Century: उंचपुऱ्या आणि ताकदवान टीम डेव्हिडच्या ३७ चेंडूत नाबाद १०२ धावांच्या झंझावाती खेळीच्या बळावर ऑस्ट्रेलियाने वेस्ट इंडिजवर तिसऱ्या टी२० लढतीत दमदार विजय मिळवला. वेस्ट इंडिजने दिलेल्या २१५ धावांच्या लक्ष्यासमोर खेळताना ऑस्ट्रेलियाची ६१/३ अशी स्थिती होती. मात्र यानंतर टीम डेव्हिडने अवघ्या अर्ध्या तासात वेस्ट इंडिजच्या गोलंदाजांचा समाचार घेत सामन्याचं चित्रच पालटलं. ऑस्ट्रेलियाने ६ विकेट्स आणि २३ चेंडू राखून लक्ष्य पार केलं. या विजयासह पाच सामन्यांच्या मालिकेत ऑस्ट्रेलियाने ३-० अशी विजयी आघाडी घेतली आहे.

टीम डेव्हिडच्या आक्रमणाआधी वेस्ट इंडिजने शे होपच्या दिमाखदार शतकी खेळीच्या बळावर २० षटकात २१४ धावांची मजल मारली. होपने ५७ चेंडूत ८ चौकार आणि ६ षटकारांसह नाबाद १०२ धावांची खेळी साकारली. ब्रेंडन किंगने ६२ धावा केल्या. या दोघांनी १२५ धावांची खणखणीत सलामी दिली. या दोघांचा अपवाद वगळता वेस्ट इंडिजच्या बाकी फलंदाजांना मोठी खेळी करता आली नाही.

प्रत्युत्तरादाखल खेळताना मिचेल मार्श आणि ग्लेन मॅक्सवेल यांनी ३० धावांची सलामी देत सुरुवात केली. यानंतर मॅक्सवेल धावबाद झाला. जोश इंगलिसने फटकेबाजीसह सुरुवात केली मात्र शेफर्डने त्याची खेळी संपुष्टात आणली. पाठोपाठ कर्णधार मिचेल मार्शही तंबूत परतला. ६१/३ अशा परिस्थितीत टीम मैदानात उतरला. त्यावेळी ऑस्ट्रेलियाला ८५ चेंडूत १५४ धावांची आवश्यकता होती. कॅमेरुन ग्रीनने टीमला साथ दिली. डेव्हिडने पहिल्या चेंडूपासून जोरदार आक्रमण केलं. तब्बल ११ षटकार आणि ६ चौकारांसह टीमने वेस्ट इंडिजच्या गोलंदाजांनी निष्प्रभ ठरवलं.

टीमने अवघ्या ३७ चेंडूत नाबाद १०२ धावांची खेळी केली. ग्रीन बाद झाल्यानंतर मिचेल ओवेनने टीमला चांगली साथ दिली. त्याने १६ चेंडूत २ चौकार आणि ३ षटकारांसह नाबाद ३६ धावांची खेळी केली. एकाक्षणी धावगतीचं आव्हान आटोक्याबाहेर जाणार असं वाटत होतं. मात्र टीमच्या खेळीने सामन्याचं चित्रच पालटलं. संस्मरणीय शतकी खेळीसाठी टीमलाच सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आलं. मालिकेतला चौथा सामना रविवारी होणार आहे. याआधी झालेल्या कसोटी मालिकेत ऑस्ट्रेलियाने निर्भेळ विजय मिळवला होता.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

ऑस्ट्रेलियासाठी टी२० प्रकारातलं हे सगळ्यात वेगवान शतक आहे. टीमने जोश इंगलिसचा विक्रम मोडला. टी२० प्रकारात ऑस्ट्रेलियासाठी शतक झळकावणारा टीम चौथाच खेळाडू आहे. याआधी ग्लेन मॅक्सवेल, जोश इंगलिस आणि आरोन फिंच यांनी शतक झळकावलं होतं.