संयोजन समितीचे माजी अध्यक्ष तोशिरो मुटो यांचा इशारा

टोक्यो : टोक्यो ऑलिम्पिकच्या उद्घाटन सोहळ्याला जाण्यास अनेक प्रमुख पुरस्कर्त्यांनी नकार दर्शवला आहे. आता अनेक खेळाडू ऑलिम्पिक नगरीत करोनाबाधित आढळून येत आहेत. त्यामुळे अखेरच्या क्षणीही ऑलिम्पिक रद्द होऊ शकते, असा इशारा टोक्यो संयोजन समितीचे माजी अध्यक्ष तोशिरो मुटो यांनी दिला आहे.

ऑलिम्पिक स्पर्धा अद्यापही रद्द होऊ शकते का, असा प्रश्न मुटो यांना पत्रकार परिषदेत विचारण्यात आला. त्यावर मुटो म्हणाले की, ‘‘किती खेळाडू करोनाबाधित आढळताहेत, यावर आमचे लक्ष असणार आहे. त्यानुसार गरज पडल्यास आम्ही संयोजकांशी चर्चा करू. अनेक खेळाडूंना करोनाची लागण झाल्यास, पुढे काय होईल हे सांगता येत नाही. त्यामुळे करोनाबाधितांची संख्या वाढल्यास, आम्ही नक्कीच ऑलिम्पिकच्या भवितव्याविषयी चर्चा करू. करोनाबाबतच्या परिस्थितीनंतर निर्णय घेण्याचे आम्ही मान्य केले आहे.’’

मुटो यांचे जपानमधील सत्ताधारी पक्षाशी जवळचे संबंध असून करोनाच्या उद्रेकानंतर ऑलिम्पिकच्या आयोजनावर जपानच्या लोकांनी आक्षेप घेतला आहे. मात्र ही स्पर्धा रद्द करणे शक्य नाही. आम्ही सुरक्षित ऑलिम्पिकच्या आयोजनाबाबत कटिबद्ध आहोत, असे आश्वासन आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीचे (आयओसी) अध्यक्ष थॉमस बाख यांनी दिले आहे.

सुरक्षित ऑलिम्पिकची सुगा यांची ग्वाही

संपूर्ण जगाला हेवा वाटेल अशा सुरक्षितपणे टोक्यो ऑलिम्पिकचे आयोजन केले जाईल, अशी ग्वाही जपानचे पंतप्रधान योशिहिदे सुगा यांनी मंगळवारी दिली. टोक्योमध्ये करोना साथीच्या पार्श्वभूमीवर आणीबाणी लागू करण्यात आली आहे. ‘‘संपूर्ण जग अडचणींचा सामना करत आहे. पण आम्ही ऑलिम्पिकच्या यशस्वी आयोजनासाठी आतूर आहोत. संपूर्ण जगाला अभिमान वाटेल असा संदेश आम्ही ऑलिम्पिकमार्फत देऊ इच्छित आहोत. त्याचबरोबर जपानी लोकांच्या आरोग्याचे आणि सुरक्षिततेचे रक्षण करण्यासाठीही आम्ही कटिबद्ध आहोत,’’ असे सुगा म्हणाले.

खेळाडूंनी दडपण घेऊ नये -बत्रा

विमानतळावर प्रदीर्घ काळ प्रतीक्षा करावी लागत असली तरी खेळाडूंनी दडपण घेऊ नये. सर्व प्रक्रिया पार पाडण्यासाठी फक्त एक तासाचा वेळ लागत आहे, असा सल्ला भारतीय ऑलिम्पिक असोसिएशनचे (आयओए) अध्यक्ष नरिंदर बत्रा यांनी दिला आहे. बत्रा सध्या टोक्योमध्ये तीन दिवसांच्या विलगीकरणात आहेत. ‘‘टोक्यो विमानतळावर दाखल झाल्यानंतर मला लोकांच्या चेहऱ्यावर भीती जाणवत होती. पण विमानतळावरील सर्व प्रक्रिया पार पाडण्यासाठी एक तासांचा वेळ लागत आहे. त्यापैकी ३० मिनिटे ही करोनाच्या चाचणीसाठी लागत आहेत. परिस्थिती अपेक्षेनुसार चांगलीच आहे, त्यामुळे खेळाडूंनी अतिरिक्त दडपण घेऊ नये,’’ असे बत्रा म्हणाले.

पदकासाठी झुंज द्या -सचिन

दडपणाला सामोरे जा मात्र दडपणाखाली दबून जाऊ नका. पदकासाठी झुंज द्या, अशा शब्दांत महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर याने भारताच्या ऑलिम्पिकपात्र खेळाडूंना शुभेच्छा दिल्या. ‘‘खेळात हार-जीत असते, असे बरेच जण म्हणतात. पण हार तुमच्या प्रतिस्पर्ध्याची असो आणि विजय तुमचा होवो, हा माझा संदेश तुमच्यापर्यंत पोहोचवत आहे. पदकासाठी शर्थीचे प्रयत्न करा. आपले स्वप्न साकार करण्यासाठी थांबू नका. तुमच्या गळ्यात ऑलिम्पिक पदक असेल आणि प्रेक्षागृहात राष्ट्रगीत आणि देशाचा तिरंगा फडकेल, हे स्वप्न बघा,’’ असा संदेश सचिनने दिला आहे.