टोक्यो : पदकाचा दावेदार मानला जाणारा नीरज चोप्रा ऑलिम्पिकमध्ये भालाफेक प्रकाराची अंतिम फेरी गाठणारा पहिला भारतीय क्रीडापटू ठरला आहे. बुधवारी पहिल्याच प्रयत्नात ८६.६५ मीटर अंतरावर भाला फेकून पात्रता फेरीतील अव्वल स्थानासह त्याने हे यश मिळवले आहे.

भालाफेक प्रकारात ८३.५० मीटर हे अंतिम फेरीच्या पात्रतेचे निकष ठरवण्यात आले होते. भारताचे आशास्थान असलेल्या नीरजने पहिल्याच प्रयत्नात हे अंतर ओलांडून थेट अंतिम फेरीमधील स्थान निश्चित केले. कारकीर्दीतील पहिल्याच ऑलिम्पिकमध्ये सहभागी झालेल्या नीरजने स्वत:च्या अ-गटातून नव्हे, तर दोन्ही गटांतून सर्वाधिक अंतर नोंदवले. सुवर्णपदकाचा दावेदार आणि २०१७ मधील विश्वविजेत्या जर्मनीच्या जोहानीस व्हेटरने अखेरच्या प्रयत्नात ८५.६४ मीटर अंतरावर भाला फेकला. व्हेटरहून सरस कामगिरी नोंदवल्याने नीरजकडून सुवर्णपदकाच्या अपेक्षा केल्या जात आहेत.

माझ्या कारकीर्दीमधील पहिल्याच ऑलिम्पिक स्पर्धेमधील कामगिरीमुळे अपेक्षा उंचावल्या आहेत. सरावात माझी अपेक्षेप्रमाणे होती नव्हती. परंतु पात्रता स्पर्धेच्या पहिल्याच प्रयत्नात परिपूर्ण भालाफेक करू शकलो. आता अंतिम फेरीत आणखी उत्तम कामगिरी करण्याचे माझे ध्येय आहे.                     – नीरज चोप्रा