नीरज चोप्राला सुवर्णपदक, भारताची ऐतिहासिक पदककमाई

भारताच्या टोक्यो ऑलिम्पिक अभियानाला वेटलिफ्टिंगपटू मीराबाई चानूच्या रौप्यक्रांतीने झोकात प्रारंभ झाला, तर शनिवारी त्याची शानदार सांगता भालाफेकपटू नीरज चोप्राच्या सुवर्णाध्यायाने झाली. यात कुस्तीपटू बजरंग पुनियाच्या कांस्यपदकाचीही भर पडली. त्यामुळे भारताने ऑलिम्पिकमधील सर्वाधिक सात पदकांच्या विक्रमाचीही नोंद केली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सुवर्णयशाचा ‘भालेदार’ २३ वर्षीय नीरजने दुसऱ्या प्रयत्नात ८७.५८ मीटर अंतरावर फेकलेल्या भाल्याने एकंदरीतच इतिहास घडवला. भारतीय अ‍ॅथलेटिक्सच्या १०० वर्षांच्या ऑलिम्पिक इतिहासात आतापर्यंत मिल्खा सिंग आणि पी. टी. उषा यांच्या शतांश सेकंदाच्या फरकाने हुकलेल्या पदकांची उणीव भासायची; पण नीरजच्या पदकाने हा दुष्काळ संपवला. याचप्रमाणे नेमबाज अभिनव बिंद्रा यांच्यानंतर ऑलिम्पिकमध्ये भारताने पटकावलेले हे दुसरे सुवर्णपदक ठरले. त्याचप्रमाणे सकाळच्या सत्रात बजरंगने डॉलेट नियाझबेकोव्हला ८-० असे नमवून कांस्यपदक पटकावले.

शतकानंतरचे यश

१९२०च्या अँटवर्प (बेल्जियम) ऑलिम्पिकमध्ये पाचसदस्यीय भारतीय संघ सहभागी झाला होता. यात तीन अ‍ॅथलिट आणि दोन कुस्तीपटूंचा समावेश होता. अ‍ॅथलेटिक्समध्ये तो भारताचा पहिला सहभाग अपयशी ठरला होता. १९०० मध्ये झालेल्या पॅरिस ऑलिम्पिकमध्ये नॉर्मन प्रिचर्ड यांनी २०० मीटर आणि २०० मीटर अडथळा शर्यतींमध्ये मिळवलेल्या दोन रौप्यपदकांचे श्रेय आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समिती भारताला देते; परंतु अनेक संशोधने आणि जागतिक अ‍ॅथलेटिक्सच्या पुराव्यांनुसार प्रिचर्ड यांनी ब्रिटनचे प्रतिनिधित्व केले होते.

 

सर्वोत्तम कामगिरी…

भारताने टोक्यो ऑलिम्पिकमध्ये एक सुवर्ण, दौन रौप्य आणि चार कांस्यपदकांसह एकूण सात पदकांची कमाई केली. ऑलिम्पिकच्या इतिहासातील भारताची ही सर्वोत्तम कामगिरी ठरली. यापूर्वी २०१२च्या लंडन ऑलिम्पिकमध्ये भारताने सहा पदकांवर नाव कोरले होते.

तेरा वर्षांनंतर… भारताचे हे ऑलिम्पिकमधील

दुसरे वैयक्तिक सुवर्णपदक ठरले. २००८च्या बीजिंग ऑलिम्पिकमध्ये नेमबाज अभिनव बिंद्राने भारतासाठी सुवर्णपदक मिळवण्याचा पराक्रम केला. १३ वर्षांनी भारताच्या खात्यात ऑलिम्पिक सुवर्णपदकाची नोंद झाली.

 

यंदाचे पदकयश…

  • नीरज चोप्रा – सुवर्ण (भालाफेक)
  • मीराबाई चानू – रौप्य (वेटलिफ्टिंग)
  • रवी दहिया – रौप्य (कुस्ती)
  • पुरुष संघ – कांस्य (हॉकी)
  • पी. व्ही. सिंधू – कांस्य (बॅडमिंटन)
  • लवलिना बोर्गोहाइन – कांस्य (बॉक्सिंग)
  • बजरंग पुनिया – कांस्य (कुस्ती)

ऑलिम्पिकमध्ये नीरज चोप्राने सुवर्णपदकाला गवसणी घातल्यामुळे टोक्योमध्ये इतिहास लिहिला गेला आहे. त्याने मिळवलेले हे यश अविस्मरणीय आहे. अतिशय उत्कटतेने खेळून नीरजने अतुलनीय कामगिरी बजावली, त्याबद्दल त्याचे अभिनंदन. – नरेंद्र मोदी, पंतप्रधान

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Tokyo olympics weightlifter mirabai javelin thrower neeraj chopra the most seven medals in the olympics akp
First published on: 08-08-2021 at 01:25 IST