ऑल इंग्लंड अजिंक्यपद स्पर्धेत जेतेपदाचे स्वप्न अधुरे राहिलेली सायना नेहवाल स्विस खुल्या स्पर्धेसाठी जेतेपदाच्या शर्यतीत आहे. या स्पर्धेत सायनाला अग्रमानांकन देण्यात आले असून, यंदाच्या वर्षांतले पहिले जेतेपद पटकावण्याचा सायनाचा प्रयत्न असेल. गतविजेत्या सायनाला या स्पर्धेच्या जेतेपदांची हॅट्ट्रिक करायला निश्चितच आवडेल.
आपल्या वाढदिवसाला अर्थात १७ मार्चला चाहत्यांना जेतेपदाची भेट देण्यास सायना उत्सुक आहे. स्पर्धेचा ड्रॉ सायनासाठी अनुकूल असून, उपांत्य फेरीपर्यंतची वाटचाल तिच्यासाठी सहज होऊ शकते. उपांत्य फेरीत तिची लढत चीनच्या शिझियान वांगशी होऊ शकते. ऑल इंग्लंड स्पर्धेत वांगवर मात करत सायनाने उपांत्य फेरी गाठली होती. या विजयाची पुनरावृत्ती करण्याची सायनाला संधीआहे. दुसऱ्या गटात ऑल इंग्लंड स्पर्धेत सायनाला पराभवाचा धक्का देणारी रात्चानोक इन्थानोन दुसऱ्या गटात आहे. भारताची युवा पी. व्ही. सिंधू याच गटात आहे. पुरुषांमध्ये जागतिक क्रमवारीत नवव्या स्थानी असणारा परुपल्ली कश्यपला पाचवे मानांकन देण्यात आले आहे. याव्यतिरिक्त एच. एस. प्रणॉय, सौरभ वर्मा, के. श्रीकांत आणि साईप्रणीथ हेही मुख्य फेरीत आहेत.