वृत्तसंस्था, नवी दिल्ली : भारतीय पुरुष संघाने १९८३चा एकदिवसीय विश्वचषक जिंकल्यानंतर देशातील क्रिकेटचा कायापालट झाला. त्याचप्रमाणे पुरुष संघाने थॉमस चषकाचे जेतेपद पटकावणे हा भारतीय बॅडमिंटनला कलाटणी देणारा क्षण ठरेल, अशी आशा या संघाचे प्रशिक्षक विमल कुमार यांनी व्यक्त केली.

विमल यांच्या मार्गदर्शनाखालील भारतीय पुरुष बॅडमिंटन संघाने १४ वेळा विजेत्या इंडोनेशियाला ३-० असा पराभवाचा धक्का देत थॉमस चषक स्पर्धेचे ऐतिहासिक जेतेपद मिळवले. अंतिम सामन्यात भारताकडून लक्ष्य सेन आणि किदम्बी श्रीकांत यांनी एकेरीत, तर सात्त्विकसाइराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी यांनी दुहेरीतील आपापले सामने जिंकले. त्यामुळे ७३ वर्षांच्या इतिहासात भारताने पहिल्यांदा ही स्पर्धा जिंकली. ‘‘अंतिम सामन्यात आमच्या खेळाडूंनी उत्कृष्ट खेळ केला. इंडोनेशियाविरुद्ध यापूर्वीची आमची कामगिरी निराशाजनक होती. मात्र मोक्याच्या क्षणी खेळ उंचावत हा सामना ३-० अशा फरकाने जिंकणे, याचे कौतुक करावे तितके थोडेच आहे,’’ असे विमल यांनी सांगितले.

‘‘१९८३मध्ये भारताने विश्वचषक क्रिकेट स्पर्धेचे जेतेपद पटकावले. त्यानंतर आपल्या देशातील या खेळाचा दर्जा अधिकच उंचावला. या खेळाची लोकप्रियता वाढली. पुरुष संघाच्या या कामगिरीमुळे  देशातील बॅडमिंटनला चालना मिळेल आणि हा खेळही लोकप्रियतेचे शिखर गाठेल अशी आशा आहे,’’ असेही विमल यांनी नमूद केले.

सर्वात मोठी कामगिरी

पुरुष संघाने थॉमस चषक जिंकणे हे भारतीय बॅडमिंटनमधील सर्वात मोठे यश होते, असे मत विमल यांनी व्यक्त केले. ‘‘प्रकाश पडुकोण आणि पुलेला गोपीचंद यांनी ऑल इंग्लंड स्पर्धा, पीव्ही सिंधूने जागतिक अजिंक्यपद स्पर्धा जिंकण्याची उत्कृष्ट कामगिरी केली आहे. मात्र जागतिक सांघिक स्पर्धा जिंकल्याशिवाय तुम्ही स्वत:ला एखाद्या खेळातील अग्रेसर देश म्हणून संबोधित करू शकत नाही. त्यामुळे थॉमस चषकाच्या जेतेपदाला भारतीय बॅडमिंटनमधील सर्वात मोठे यश नक्कीच म्हणता येईल,’’ असे विमल यांनी सांगितले.

सर्वाच्या योगदानामुळे ऐतिहासिक यश

भारताचा अनुभवी बॅडमिंटनपटू श्रीकांतने सोमवारी जेतेपदाबद्दल आपल्या भावना व्यक्त केल्या. ‘‘हार न मानण्याची वृत्ती आणि मानसिक कणखरतेमुळेच आम्हाला हे यश मिळू शकले. खेळाडू म्हणून मी जिंकण्यापेक्षा अधिक सामने गमावले आहेत. मात्र हा विजय माझ्यासाठी कायम खास असेल. या संघाचे कर्णधार भूषवणे हे माझे भाग्य होते. भारतीय बॅडिमटनचे भविष्य योग्य हातांमध्ये असल्याचा मला विश्वास आहे. सर्व खेळाडूंच्या योगदानाशिवाय ही ऐतिहासिक कामगिरी शक्य नव्हती,’’ असे श्रीकांत म्हणाला.