फिफा कुमार (१७ वर्षांखालील) विश्वचषक फुटबॉल स्पर्धा ही अनेक उदयोन्मुख खेळाडूंसाठी महत्त्वाची ठरेल. १९९७ मध्ये याच स्पर्धेने माझ्या कारकीर्दीची शानदार सुरुवात झाली होती, असे ब्राझीलचा महान फुटबॉलपटू रोनाल्डिन्होने सांगितले.

इजिप्तमध्ये वीस वर्षांपूर्वी रोनाल्डिन्होच्या ब्राझील संघाने कुमारांची विश्वचषक स्पर्धा जिंकण्याची किमया साधली होती. त्यानंतर २००२ मध्ये रोनाल्डिन्होला फिफा विश्वविजेतेपद अनुभवता आले होते. कुमारांच्या विश्वविजेत्या संघातील एकंदर १२ खेळाडू देशाला जगज्जेतेपद जिंकून देणाऱ्या वरिष्ठ संघात होते.

‘‘कुमारांची विश्वचषक स्पर्धा ही माझ्यासाठी अतिशय खास होती. माझ्या व्यावसायिक कारकीर्दीला याच स्पर्धेमुळे प्रारंभ झाला. मी केवळ स्पर्धेत सहभागी होणाऱ्या नव्हे, तर विश्वविजेत्या संघाचा एक खेळाडू होऊ शकलो, याबद्दल मी स्वत:ला भाग्यवान समजतो,’’ असे २००४ आणि २००५ मध्ये फिफाकडून सर्वोत्तम जागतिक फुटबॉलपटूचा पुरस्कार जिंकणाऱ्या रोनाल्डिन्होने सांगितले.

‘‘कुमारांची विश्वचषक स्पर्धा अनेक खेळाडूंसाठी महत्त्वाची ठरते, कारण त्यांच्या कारकीर्दीला या स्पर्धेमुळे उत्तम चालना मिळते. युवा खेळाडू मोठी स्वप्ने बाळगून असतात आणि ही स्पर्धा त्यांची स्वप्ने सत्यात उतरवण्याची संधी देते. मला याची प्रचीती आली असल्यामुळे या स्पर्धेशी माझे ऋणानुबंधाचे नाते आहे,’’ असे रोनाल्डिन्होने सांगितले.

रोनाल्डिन्होच्या २० वर्षांच्या कारकीर्दीत ब्राझीलने जवळपास सर्वच विजेतेपदांना गवसणी घातली आहे. २००२ मध्ये ब्राझीलने विश्वचषक जिंकला, मग २००५ मध्ये कॉन्फेडरेशन चषक आणि २००६ मध्ये युरोपियन चॅम्पियन्स लीग स्पर्धेवर नाव कोरले. रोनाल्डिन्हो सध्या भारतात चालू असलेल्या प्रीमियर फुटसाल स्पर्धेत दिल्ली ड्रॅगन्सचे प्रतिनिधित्व करीत आहे.

‘‘आम्ही जगज्जेतेपदाला गवसणी घातल्यानंतर मी विश्वचषक उंचावला, तो माझ्या आयुष्यातील सर्वोच्च क्षण होता. त्या क्षणाची अनुभूती अभिमानास्पद असते,’’ असे रोनाल्डिन्होने सांगितले. ३७ वर्षीय रोनाल्डिन्होने ९७ सामन्यांत ब्राझीलचे प्रतिनिधित्व करताना ३३ आंतरराष्ट्रीय गोल केले आहेत.